वायगाव (नि़) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हस्ते १९४८ उद्घाटन झालेल्या ग्रा़पं़ कार्यालयास कलंकित करण्यात आले़ स्वातंत्र्य दिनीच या ग्रा़पं़ कार्यालयात दारूच्या रिकाम्या शिश्या सापडल्याने खळबळ माजली़ या प्रकारामुळे ग्रामस्थांत असंतोष पसरला होता़ग्रा़पं़ कार्यालयात दारूच्या खाली शिश्या पिण्याच्या पाण्यासाठी ठेवलेल्या माठाच्या बाजूला कचऱ्याखाली लपवून ठेवलेल्या अवस्थेत सापडल्या. ग्रामस्थांना शिश्या निदर्शनात आल्यानंतर त्या बाहेर काढण्यात आल्या़ तब्बल २६ शिश्या आढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ शिवाय कार्यालया परिसरात आणखी अन्य ठिकाणीही दारूच्या ५० च्या जवळपास शिश्या आढळल्या़ कार्यालयात दारूच्या शिश्या आल्या कशा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ याबाबत ग्रा़पं़ प्रशासनास विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली़ या शिश्या कुणी बाहेरून तर आणून टाकल्या नाहीत ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे़ स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ग्रा़पं़ कार्यालयात दारूच्या खाली शिश्या सापडणे ही प्रशासनासाठी लज्जास्पद बाब आहे. ग्रा़पं़ मध्ये आढळलेल्या दारूच्या शिश्या सध्या ग्रामस्थांचा चर्चेचा विषय ठरत आहे़(वार्ताहर)
ग्रामपंचायतीत सापडल्या दारूच्या रिकाम्या शिश्या
By admin | Updated: August 16, 2014 23:39 IST