विविध मागण्या : जिल्हा कचेरीसमोर निदर्शने वर्धा : भूमी अभिलेख खाते हे तांत्रिक खाते म्हणून घोषित करण्याच्या मागणीसह जिल्हा भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यावेळी जिल्हाकचेरीसमोर संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत निदर्शने केली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.भूमी अभिलेख खाते तांत्रिक खाते म्हणून घोषित करावे व कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतनश्रेणी लागू करावी, या प्रमुख मागणीसह कर्मचाऱ्यांना विमा योजनेंचा लाभ देण्यात यावा, वर्ग तीन व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती अनुकंप भरती, खात्यामध्ये बरसात कार्यक्रम राबविणे आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्या शांततामय व चर्चेच्या माध्यममातून पूर्ण व्हाव्यात अशी संघटनेची मागणी आहे. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाही. तोपर्यंत सर्व कर्मचारी बेमुदत संपावर राहणार असल्याचे संघटनेने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी संपावर गेल्याने शेतजमिनीच्या मोजमापाचे काम रखडले आहे. सध्या शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता शेतीची वाटणी करण्यात येत असल्याने त्याचा त्रास शेतकऱ्यांना होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागण्या मान्य करण्यासाठी बसलेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अरुण वऱ्हाडे, गजानन डोर्ईफोडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
भूमी अभिलेख संघटनेचे कर्मचारी बेमुदत संपावर
By admin | Updated: August 16, 2014 23:37 IST