कुटुंबीय चिंतीत : महावितरणमधील प्रकारवर्धा : टेक्निशियनच्या प्रशिक्षणासाठी अमरावती येथे गेलेला पोहणा येथील महावितरणचा कर्मचारी अद्याप परत आला नाही. यामुळे चिंतीत असलेल्या कुटुंबीयांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली. कलंदर रहेमान शेख (४५), असे कर्मचाऱ्याचे नाव आहे.पोहणा येथे कलंदर रहेमान शेख हे सहायक लाईनमन पदावर कार्यरत होते. ते खापरी, जांगोणा, वेणी या तीनही गावांचा कारभार पाहत होते. महिनाभर काम करूनही कधी १८ तर कधी २० दिवसांचे वेतन कनिष्ठ अभियंता बावणकर यांच्या स्वाक्षरीने निघत होते. वेतन कमी निघत असल्याने नेहमी खटके उडत होते. १ जून रोजी उपअभियंता कार्यालय हिंगणघाट येथून टेक्निशियनच्या प्रशिक्षणासाठी कर्मचारी पाठविण्याचे पत्र पोहणा बावणकर यांना प्राप्त झाले. यावरून कलंदर यांना ३ जून रोजी पावर स्टेशन मोर्शी रोड अमरावती येथील प्रशिक्षण केंद्रावर जाण्यास सांगण्यात आले. कलंदर रहेमान शेख हे पत्नी कमरूनसह ३ जून रोजी सकाळी ११ वाजता प्रशिक्षण केंद्रावर पोहोचले. त्यांची पत्नी रात्री परत आली. लगेच ४ जून रोजी कलंदरची प्रकृती बिघडली, त्यांना घेण्यासाठी या, असा फोन आला. यावरून कमरून मुलासह तेथे गेल्या असता कलंदर तेथे मिळाले नाहीत. गाडगेनगर पोलीस ठाणे व वीज अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता टाळाटाळ करण्यात आली. यावरून कलंदर यांच्याशी घातपात झाल्याचा संशय व्यक्त करीत त्याच्या पत्नीने चौकशीची मागणी पोलीस अधीक्षकांना निवेदनातून केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
प्रशिक्षणाकरिता गेलेला कर्मचारी घरी परतलाच नाही
By admin | Updated: June 28, 2015 02:40 IST