घोराड : तलाठी कार्यालयांतर्गत मौजा घोराड येथील ०.४३ हे़ आर असलेले शेत तब्बल २३ वर्षांनी ०.१२ हे़ आर दाखविण्यात आले़ प्रशासनाने केलेल्या चुकीची दुरूस्ती करण्यासाठी गत सहा वर्षांपासून वयोवृद्ध शेतकऱ्याला पायपीट करावी लागत आहे़ संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे़ पुंडलीक सूर्यभान वरटकर यांनी १९७९ मध्ये नाना मोहिते यांचे ०.४३ आर शेत विकत घेतले होते़ तसा रितसर फेरफारही करण्यात आला; पण २००८ मध्ये या शेताचा सातबारा घेतला असता सर्व्हे क्रमांक बदलला आणि ०.१२ आर शेती त्यावर नमूद करण्यात आली़ इतर अधिकारात असलेल्या रकान्यामध्ये ३० जुलै २००३ हा दिनांक नमूद करण्यात आला़ त्यावेळी हा फेरफार पुन्हा दुरूस्ती करून देण्यात यावा, यासाठी विनंती करण्यात आली; पण दुरूस्ती झाली नाही़ महसूल विभागाने कायम याकडे दुर्लक्ष केले आहे़ भूमापन कार्यालयाने केलेल्या शेतमोजणीमध्ये आजही सदर शेतजमीन ०.४३ आर असल्याचे दिसून आले आहे. गत सहा वर्षांपासून सातबारा दुरुस्तीसाठी सदर शेतकरी महसूल कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित आहे़ यामुळे महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ २००३ मध्ये कार्यरत तलाठ्याने हा महाप्रताप केला असला तरी मनस्ताप मात्र वयोवृद्ध शेतकऱ्याला सहन करावा लागत आहे़ २००३ पासून आजपर्यंत अनेक तलाठी आले; पण त्यांचा सातबारा दुरूस्त करण्यात आला नाही़ असे का, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागतो़ संबंधितांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)
न्यायासाठी वयोवृद्ध शेतकरी करतोय पायपीट
By admin | Updated: September 25, 2014 23:29 IST