किरण बेदी : विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार कार्यक्रमवर्धा : शिक्षणाला दोन प्रकाराने पाहता येते एक म्हणजे आरसा व दुसरे म्हणजे खिडकी. आरशामध्ये आपले प्रतिबिंब पाहता येते तर खिडकीच्या माध्यमातून अथांग पसरलेल्या क्षेत्रात स्वत:ची प्रगती साधता येते. शिक्षण केवळ पदवी प्राप्त करणे नव्हे तर चांगल्या मनुष्याची निर्मिती शिक्षणाद्वारे करणे आवश्यक असल्याचे मत मॅगेसेसे पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्या डॉ. किरण बेदी यांनी व्यक्त केले. जय महाकाली शिक्षण संस्था अग्निहोत्री ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशन्स वर्धा द्वारे शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता अग्निहोत्री इंजिनियरिंग कॉलेज सभागृह, नागठाणा रोड सिंदी (मेघे) वर्धा येथे राणीबाई अग्निहोत्री स्मृतीदिन तसेच महाविद्यालयीन प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या गुण गौरव समारोह पार पडला. यावेळी प्रमुख्य अतिथी म्हणून डॉ. किरण बेदी बोलत होत्या. संस्थाध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अतिथी म्हणून चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी उर्फ धन्नु महाराज उपस्थित होते. डॉ. बेदी म्हणाल्या, शिक्षण असे असले पाहिजे की, ज्यातून व्यावसायिक मुल्य समाजात रुजवता येईल. आजचा काळ हा पूर्णत: व्यावसायिक मुल्यांवर आधारित आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी प्राप्त होवू शकते. वर्धा ही गांधी व विनोबांची भूमी आहे. या दोघांनीही श्रमदान आणि स्वच्छतेला महत्त्व दिले. आपणही सप्ताहातून एक दिवस केवळ एक तास स्वच्छता व श्रमदानाला दिला पाहिजे, असे स्पष्ट मत डॉ. बेदी यांनी व्यक्त केले. शंकरप्रसाद अग्निहोत्री म्हणाले, शिक्षणाचे मुल्य समजून आचरणात आणले तर समाजाचा विकास घडून येतो. डोक्यातील वैचारिक प्रदूषण दूर केले तर जीवनाचा खरा मार्ग सापडेल. त्रिवेदी यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केले. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या हस्ते डॉ. किरण बेदी यांना मानपत्र व स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेच्या सचिव शिवकुमारी अग्निहोत्री, संचालिका पूजा अग्निहोत्री, रमेश मुरडीव, प्रदीप अग्निहोत्री, प्रकाश अग्निहोत्री, रमेश अग्निहोत्री, महेश त्रिवेदी, डॉ. अशोक जैन, डॉ. अरुणा जैन, शुंभनाथ गुप्ता, मदन तिवारी, सुनील कालरा उपस्थित होते. यावेळी संस्थांतर्गत विविध महाविद्यालय व विद्यालयाच्या गुणवत्ताा प्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. किरण बेदी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. संचालन प्रा. प्रफुल दाते यांनी दिली. आभार प्राचार्य डॉ. एस. एन. मूर्ती यांनी केले. प्राचार्य डॉ. राजकीशोर तुगनायत, प्राचार्य कुमार रायजादा, प्राचार्य चंद्रकांत कोठारे, प्राचार्य हाजी रिजवान खान, मुख्याध्यापक निळकंठ ढोबाळे, प्राचार्य गौरी चौधरी, जनसंपर्क अधिकारी प्रमोद गिरडकर, अरुण वसू व अभिजीत रघुवंशी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
शिक्षण हे माणूस बनविण्याचे माध्यम
By admin | Updated: July 25, 2015 02:16 IST