आयटीआय टेकडी परिसरातील घटना वर्धा : शहरातील आयटीआय टेकटी परिसरातील कृत्रिम तलावात मित्रासोबत पोहायला गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. योगेश गोपाल अटाळकर (१२) रा. गजानननगर असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. गजानननगर येथील योगेश अटाळकर हा मित्रांसोबत आयटीआय टेकडी भागातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ तयार झालेल्या तलावात पोहण्यासाठी गेला होता. ऐरवी येथे गोळा होणारे पाणी वाहून जाते. परंतु, याच परिसरात सुरू असलेल्या बांधकामामुळे जलशुद्धीकरण केंद्रातून सोडलेले पाणी वाहून जाणास अडथळा निर्माण झाला होता. परिणामी, या खड्ड्यातील पाण्याच्या पातळीतही काही दिवसांपासून वाढ झाली होती. मित्रांसोबत पोहायला आलेल्या योगेशला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे संजय चौके व अनिल चव्हाण यांनी घटनास्थळ गाठून मृतदेत ताब्यात घेत पंचनामा करीत मृतदेह उत्तरिय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. या घटनेची रामनगर पोलिसांनी नोंद घेतली आहे.(शहर प्रतिनिधी)
मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
By admin | Updated: May 3, 2017 00:36 IST