लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळीच्या पूर्वीपासून रापमचे कर्मचारी कामबंद आंदोलनाच्या माध्यमातून विलीनीकरणाचा लढा देत आहेत. निम्म्याहून अधिक रापमच्या कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन अजूनही कायम असले तरी याच संप काळात जिल्ह्यात रापमच्या तीन बसेसवर दगडफेक झाली. या नुकसानग्रस्त बसेसमधील एक बस यवतमाळ जिल्ह्यातील असून, दोन बसेस या आर्वी आगाराच्या आहेेत. आर्वी आगारातील बसेसवर दगडफेक करणाऱ्यांवर तळेगाव पोलीस ठाण्यात तर यवतमाळ जिल्ह्यातील बसवर दगडफेक करून बसचे नुकसान केल्याप्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेकीत आर्वी आगारातील दोन बसेसच्या काचा फुटल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाचे एकूण २० हजारांचे नुकसान झाले आहे.
संपाचा सर्वाधिक आर्थिक फटका वर्धा आगाराला- जिल्ह्यात पुलगाव, वर्धा, आर्वी, हिंगणघाट व तळेगाव असे एकूण राज्य परिवहन महामंडळाचे पाच आगार आहेत. या पाचही आगारांतून दररोज सुमारे ८५० बस फेऱ्यांचे नियोजन होते. पण कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाच्या पहिल्या दिवशीपासूनच जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा येथील आगारातून अद्याप एकही बस सोडण्यात आलेली नाही. परिणामी, संपाचा सर्वाधिक आर्थिक फटका वर्धा आगाराला बसल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
तळेगाव अन् वडनेर ठाण्यात गुन्हे दाखल- यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा आगाराच्या बसवर दगडफेक करून बसचे नुकसान केल्याप्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात तर आर्वी आगारातील दोन बसेसवर दगडफेक करून बसेसचे नुकसान केल्याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.
या मार्गांवर धावत आहेत रापमच्या बसेस- निम्म्याहून अधिक रापमचे कर्मचारी कामबंद आंदाेलनात सहभागी राहून सध्या विलीनीकरणाचा लढा देत आहेत. असे असले तरी काही कर्मचारी विविध कारणांमुळे कर्तव्यावर रुजू झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काही आगारांतून बोटावर मोजण्या इतक्याच बसेस पोलीस बंदोबस्तात सोडल्या जात आहेत. सध्या हिंगणघाट आगारातून हिंगणघाट-सिर्सी, तळेगाव आगारातून तळेगाव-आष्टी तर आर्वी आगारातून आर्वी-पुलगाव व आर्वी-आष्टी मार्गावर बसेस सोडल्या जात आहेत.