सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : सिमेंट घेऊन जाणारा ट्रक फसला खड्ड्यातघोराड : येथील हिंगणी मार्गावर पाणी पुरवठ्याच्या जलवाहिनीचे काम करण्याकरिता खोदलेला खड्डा अपघाताचे कारण ठरत आहे. या खड्ड्यात गुरुवारी सिमेंट घेवून जाणारा ट्रक फसला. ट्रकला विशेष गती नसल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु या खड्ड्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही. घोराडची हद्द सुरू होताच हिंगणीकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीसाठी खड्डा करण्यात आला होता. हा खड्डा काम झाल्यानंतर बुजविताना हलगर्जी करण्यात आली. या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता ‘लोकमत’ने यापूर्वीच वर्तविली होती. मात्र याकडे संबंधित विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले. त्यामुळे सदर खड्ड्यात गुरुवारी एक सिमेंटचा ट्रक चांगलाच फसला. समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देण्याकरिता रस्त्याच्या कडेला ट्रक घेताच तो या खड्ड्यात फसला. यामुळे बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला. ट्रकमधील साहित्य बाजुला काढून ट्रक बाहेर काढण्यात आला. या बांधकामाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुुठलीही परवानगी घेतली नसल्याचे अभियंता कुंटे यांनी सांगितले होते. सेलू पंचायत समिती कार्यालयापासून यशवंत विद्यालयापर्यंतच्या १ कि़मी. अंतरात असे अनेक खड्डे खोदल्या गेले पण ते योग्य रित्या बुजविण्यात आले नाही. याकडे लक्ष देत कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे हा प्रकार घडल्याने आता तरी सदर खड्डा बुजविण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)
जलवाहिनीसाठी खोदलेला खड्डा अपघातास कारण
By admin | Updated: November 21, 2015 02:34 IST