वनविभागाचे दुर्लक्ष : पर्यावरणाचा ऱ्हासआर्वी : वनसंपदा वाढावी म्हणून शासन प्रयत्न करीत आहे. यासाठी वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे; पण अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यात शासन, प्रशासन अपयशी ठरत आहे. यामुळे खर्च व्यर्थ जात असून अवैध वृक्षतोडीमुळे वनसंपदाच धोक्यात आल्याचे आर्वी वन परिक्षेत्रात दिसून येत आहे. याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.आर्वी वनपरिक्षेत्रात अधिकाधिक बिटमध्ये अवैध सागवान तोडीला उधान आले आहे. सागवानसह अन्य प्रजातीच्या वृक्षांचीही सर्रास कत्तल केली जात आहे. अवैध तोडीचा माल जप्त करून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. असे असले तरी वृक्षतोड सर्रास सुरूच आहे. काही गावात दोन वर्षांपूर्वी वनसंरक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे; पण या समित्या अवैध वृक्षतोडीला लगाम लावण्यासाठी कुठलाही प्रयत्न करीत नसल्याचे दिसते. अवैध वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी वनविभागाने कुठलेही प्रयत्न केले नाही. इंदरमारी, माळेगाव, खानवाडी आदी जंगलात काही दिवसांपासून तेंदुपत्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे मोठ्या वृक्षांसह वनौषधीही जळून नष्ट झाली आहे. तळेगाव (श्या.पं.) व अन्य गावांत शिकाऱ्यांकडून ससे, निलगाय, हरीण व मोरांची शिकार केली जात असल्याचे सांगण्यात येते; पण वन विभागातील अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा उपवनसंरक्षकांनी याकडे लक्ष देत अवैध वृक्षतोड व शिकारीवर आळा घालावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी निवेदनातून केली आहे.(शहर प्रतिनिधी)
अवैध वृक्षतोडीमुळे वनसंपदा धोक्यात
By admin | Updated: April 8, 2016 02:00 IST