केळझर : संगणकीय माहिती भरताना राशनकार्ड धारकांची चुकीची माहिती भरण्यात आली़ यामुळे अनेक पिवळे व केशरी कार्डधारक तसेच गोरगरीब नागरिकांसाठी सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेपासून वंचित राहावे लागत आहे़ या चुका दुरूस्त करण्यास गेलेल्या पिवळे व केशरी कार्डधारकांना सेलूच्या तहसील व जिल्हा पुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी जबाबदारी एकमेकांवर ढगलत ढकलन असल्याचा अनुभव आला़ हा संगणकीय दोष दूर करण्याकरिता कुणाकडे जावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़दुर्धर रोगांवर महागडा औषधोपचार करण्याची आर्थिक परिस्थिती नसलेल्या अनेक गरीब कुटुंबातील सदस्यांचा अकाली मृत्यू होतो़ हे प्रमाण वाढले होते़ काही वेळा कुटुंबातील कमावता व्यक्ती मृत्यू पावल्यास त्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळते़ या सर्व बाबींचा विचार करून शासनाने गोरगरीबांना वैद्यकीय उपचार घेता यावे म्हणून पिवळे व केशरी शिधापत्रिका धारकांसाठी राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली़ या योजनेंतर्गत गाव पातळीवर ग्रा़पं़ मधून या राशनकार्ड धारकांना संगणकीय डाटाबेस माहितीवरून विमा कार्ड मोफत वितरित करण्याचे काम सुरू आहे; पण संगणकीय डाटामध्ये शेकडो रेशनकार्ड धारक कुटुंबांची माहिती अपडेट करताना अनेक चुका केल्या आहेत़ या योजनेस पात्र असलेल्या अनेक लाभार्थ्यांच्या आरोग्य विमा कार्डावर कुटुंबप्रमुखासह कुटुंबातील सर्वच सदस्यांची नावे गहाळ झालीत़ यामुळे हे विमा कार्ड कुचकामी ठरत आहे़संगणकीय डाटाबेस भरताना करण्यात आलेल्या मानवीय चुकीची दुरूस्ती करण्यास तालुका व जिल्हा पातळीवरील संबंधित जबाबदार अधिकारी तयार नाहीत़ ते सर्व आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यात धन्यता मानत आहेत़ यामुळे गरजू लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येत नसल्याचे दिसून येत आहे़(वार्ताहर)
संगणकातील दोषांमुळे गरजू कुटुंब जीवनदायी योजनेपासून वंचित
By admin | Updated: August 18, 2014 23:39 IST