वर्धा : हिंगणघाटकडे जात असलेल्या मार्गावरील बोरगावलगत फार्मसी महाविद्यालयाजवळ पुलाच्या कडा खचल्याने भीषण अपघात होऊन वाहने नाल्यात उलटण्याची शक्यता बळावली आहे़ याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन पुलाची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे़वर्धा- हिंगणघाट मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते़ याच मार्गावर अभियांत्रिकी महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते़ दोन महिन्यापूर्वी अपघातात फार्मसी महाविद्यालयाजवळील नाल्यावरील पुलाच्या उजव्या बाजूचे कठडे तुटले़ या पुलाची उंची ही जमिनीपासून २० ते २५ फूट आहे़ भूगाव येथे औद्योगिक वसाहत असल्यामुळे रात्रीच्या वेळी जड वाहनांची वर्दळ येथे सुरू असते़ या पुलाचे कठडे तुटल्याने भरधाव वाहने पुलाच्या खाली कोसळण्याची शक्यता बळावली आहे़ दोन महिने उलटूनही बांधकाम विभागाने तुटलेल्या कठड्यांची दुरूस्ती तर सोडा साधा सूचना फलकही लावला नाही़ या मार्गाने लोकप्रतिनिधींची वाहनेसुद्धा दररोज जातात़ त्यांचेही दुर्लक्ष होत आहे. पुलालगतच एक सभागृह आहे़ सभागृहात पार्किंगसाठी व्यवस्था नसल्याने नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करतात़ सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)
पुलाच्या कडा खचल्याने अपघाताचा धोका
By admin | Updated: May 16, 2015 02:14 IST