तळेगाव (श्या.) : परिसरात शेतकरी वर्गाची महत्त्वाची असलेली सोयाबीन, तुर व कपाशी आदी पिके पावसाअभावी वितभरच वाढली आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या आसपास दोन फुटापर्यंत वाढणाऱ्या कपाशीचे डौलदार देखणे दृश्य यंदा कुठेच पाहावयास मिळत नाही. सोयाबीनची तर वाढच खुंटली आहे. या परिस्थितीने हताश शेतकऱ्यांनी शेतीच्या उत्पन्नाची आशाच सोडली आहे. यंदाच्या पोळा सणावरही दु:खाचे सावट पसरले आहे. कपाशी, सोयाबीनवरच वर्षभराची अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने शेतकऱ्यांनी यंदा दुबार व तिबार पेरण्या केल्या. पण पावसाचे सारे गणित यंदा विस्कटले. अकाली पावसासोबतच लहरी भारनियमन, वन्य प्राण्यांचा त्रास यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. जुन व जुलै महिन्यात अत्यल्प पाऊस झाला. पावसाने आॅगस्ट महिन्यात तरी दमदार हजेरी लावावी, ही शेतकरी वर्गाची अपेक्षा फोल ठरली. गतवर्षीच्या तुलनेत कमी झालेल्या पावसाने ऐन उमेदीत असलेल्या पिकांची वाढ खुंटली. परिसरात वादळी पावसाने आधीच संत्रा पिकाचे अतोनात नुकसान झाले. या परिस्थितीत सरकारी यंत्रणेकडून अपेक्षित असलेले सहकार्य मिळत नसल्याची तक्रार आहे. तळेगाव परिसरात तर शेतकऱ्यांनी सोयाबीनची आशा सोडी असून आपले शेत हरभऱ्यासाठी नांगरणी सुरू केले आहे. शासनाने विजेची बिले व्याज पूर्ण माफ करण्याची अपेक्षा आहे.(वार्ताहर)
पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली
By admin | Updated: August 18, 2014 23:40 IST