देवाला साकडे : शेतकऱ्यांचे आकाशाकडे डोळेविजय माहुरे - घोराडरोहिणी बरसला नाही, मृग कोरडा गेला, आर्द्राही कोरडाच जाणार असल्याची चिन्हे आहेत. येत्या ६ जुलैपासून पुनर्वसू नक्षत्र गाढवाचे वाहन घेवून येत आहे. सुरुवातीचे तीनही नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेल्यात जमा आहे. शेतकऱ्यांकरिता महत्त्वाचे असलेल्या दोनही नक्षत्रात पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ येण्याची शक्यता बळावली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. या पावसाकरिता शेतकरी आता वरून राजाला साकडे घालत आहेत. आषाढी एकादशी काही दिवसावर आल्याने शेतकरी पांडुरंगाला साकडे घालत आहे. घोराड येथील संत केजाजी महाराजांच्या मंदिरात रोज सायंकाळी पावसाकरिता शेतकरी धाव घेत आहेत. रोहिणीत पाऊस नाही. मृगाची आशा फोल ठरली, आर्द्रात ओलाव्याचा पत्ता नाही. अशा स्थितीत अवकाळी आलेला पाऊस पाहता पावसाळा चांगला असेल अशी भाबडी आशा आता फोल ठरत आहे़ अवघ्या पाच दिवसावर पुनर्वसू नक्षत्राला प्रारंभ होत आहे़ मृग नक्षत्रात १७ जूनला पाऊस आल्याने दुसऱ्या दिवशी काही शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली़ तब्बल आठ दिवस उन्हाळ्यासारखी उन्ह तापली अन् आर्द्रा नक्षत्रात पावसाची आशा धुळीस मिळाली. अशात जिल्ह्यात काही भागात आलेला पाऊस शेतकऱ्यांना दुबार पूरणीकडे घेवून गेला. गत आठ दिवसापासून कडक उन्ह तापत असल्याने बियाण्याला फुटलेले अंकूर जमिनीबाहेर येवून कोमजले आहेत. बहुतांश शेतकरी आता मोड करीत आहे़त. गावागावात कुठे धोंडी, तर कुठे मोहल्ला व गाव भोजन, देवाच्या अंगावर पाणी टाकून आंघोळ करणे आदी कार्यक्रम सुरू झाले आहेत. असे असतानाही वरुण राजा प्रसन्न होण्याची चिन्हे नाहीत. पावसाअभावी शेतकऱ्यांचे मन सुन्न आहे़ ओलीताची असलेली कपाशीची रोपटे या उन्हामुळे करपत आहेत. रात्रीचा दिवस करून आटापिटा करणाऱ्या बागायती शेतकऱ्यांपुढे हवालदिल होण्याची वेळ आली आहे़पावसाळ्यात चक्क उन्हाळा तापत असल्याने चिंतेची गडद छाया शेतकऱ्यांवर आहे़ सलग तीन वर्षांपासून शेतकऱ्यांवर अस्माणी संकट येत आहे. आर्थिक दृष्ट्या हतबल बळीराजाला पुन्हा बियाणे घेवून पेरणी करावी लागणार आहे़ यासाठी पैसा कुठून आणावा असा प्रश्न उभा ठाकला आहे़ जून महिना पूर्णत: कोरडा गेला, जुलै महिन्याला प्रारंभ झाला. जून महिन्यात केलेल्या पेरण्या नाममात्र ओलीत क्षेत्रात तग धरून आहे. एकंदरीत एक महिन्याचा खरच खरीप हंगाम साथ होईल का? असे एक ना अनेक प्रश्न उभे असून बळीराजाची झोप उडाली आहे़
पावसाअभावी कोरड्या दुष्काळाचे सावट गडद
By admin | Updated: July 1, 2014 23:37 IST