गावसंख्येत वाढ होणार : अंतिम पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्षसुरेंद्र डाफ - आर्वीगत तीन वर्षांपासून आर्वी तालुक्यात सुरू असलेल्या नापिकी, जंगली जनावरांचा वाढलेला हैदोस या पार्श्वभूमीवर आर्वी तालुक्यातील शेतकरी पुरता आर्थिक कोंडीत सापडला आहे़ तालुक्यात असलेल्या सहा महसूल मंडळातील १७२ गावांची पैसेवारी ५० च्या आत आहे. कपाशीचा वेचा अद्याप पुरेशा झाला नसल्याने दोन किंवा तीन कपाशी वेचे झाल्यावर या पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर होणार असल्याचे महसूल विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. सध्या सोयाबीनच्या शेताची आणेवारी जाहीर झाली आहे़ तर कपाशी पीक उशिरा निघत असल्याने या पिकाची अंतीम पैसेवारी १५ जानेवारीनंतर जाहीर होणार आहे़ यात ५० पैसे पैसेवारीच्या गावासंख्येत वाढ होणार असल्याचे महसूल विभागाच्यावतीने सांगण्यात आले़ याचा लाभ या भागातील शेतकऱ्यांना होणार असल्याचेही बोलले जात आहे. आर्वी तालुक्यात आर्वी, वाठोडा, रोहणा, विरूळ, खरांगणा, वाढोणा ही सहा महसूल मंडळे येतात. आर्वी तालुक्यातील १७२ गावांची पैसेवारी ५० च्या आत तर ३६ गावांची ५० पेक्षा अधिक दाखविली आहे. सध्या कापसाचा हंगाम सुरू असून कपाशी पिकाचे दोन ते तीन वेचे झाल्यावरच त्याची पैसेवारी ठरविल्या जाईल. त्यामुळे अंतिम आणेवारीसाठी १५ जानेवारी पर्यंत मुदत आहे़ तालुक्यातील आर्वी-३४, वाठोडा-३६, रोहणा-नऊ, विरूळ-३६, खरांगणा-२६, वाढोणा ३६ आदी १७२ गावांचा यात समावेश आहे़ गत तीन वर्षांपासून आर्वी तालुक्यात नापिकी, दुष्काळ व जंगली जनावरांनी हैदोस घातल्याने शेतकरी तिहेरी संकटात सापडला आहे़ येत्या हिवाळी अधिवेशनात या नापिकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कुठल्या सवलती दिल्या जाते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे़ आर्वी तालुक्यातील जंगली श्वापदांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक नष्ट झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यासाठी हा गंभीर प्रश्न झाला आहे़ याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती
By admin | Updated: November 27, 2014 23:38 IST