समुद्रपूर : गुरुदेव इंडस्ट्रिज उबदा येथून २०० पोते सोयाबीन भरून निघालेला ट्रक चालकानेच पळविल्याची घटना रविवारी उघडकीस आली़ या घटनेमुळे व्यापाऱ्यांत खळबळ निर्माण झाली़ बुधवारी नर्मदा सॉल्वेन्स प्रायव्हेट लिमिटेड अंजनखेडा जि़ वाशिमचे प्रतिनिधी गणेश नामक व्यक्ती उबदा येथील गुरूदेव इंडस्ट्रीज येथे आला़ त्याने २०० पोते सोयाबिन पाहिजे, असे सांगितल्याने सदर पोते वाहतुकीकरिता हिंगणघाट येथील साईबाबा ट्रान्सपोर्ट यांच्याशी संपर्क करण्यात आला़ सदर ट्रान्सपोर्टने एम़एच़ १८ ए़ए़ ५२२८ क्रमांकाचा ट्रक उपलब्ध करून दिला. सदर ट्रकमध्ये बुधवारी २०० पोते सोयाबिन किंमत ७ लाख ४३ हजार ७४५ भरून वाशिमकडे रवाना करण्यात आला; पण शुक्रवारी सायंकाळपर्यंत सदर ट्रक पोहोचलाच नसल्याची माहिती गणेश याने गुरूदेव इंडस्ट्रीजचे संजय दुलानी यांना दिली़ यानंतर साईबाबा ट्रान्सपोर्ट हिंगणघाटकडे विचारणा केली असता त्याने माहिती नसल्याचे सांगितले. सदर ट्रक चालक मो. इरफान मो़ करीम रा़ जामा मस्जिदजवळ मेहकर जि. बुलडाणा यांच्याशी संपर्क साधला असता त्याचा मोबाईल बंद होता़ यावरून सोयाबीनसह ट्रक चालकानेच पसार केल्याचा संशय बळावल्याने गुरूदेव इंडस्ट्रीजचे संजय दुलानी यांनी समुद्रपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली़ तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला़ पुढील तपास आयपीएस अधिकारी राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनिल जिट्टावार यांच्यासह पोलीस कर्मचारी करीत आहेत़(तालुका प्रतिनिधी)
२०० सोयाबीन पोते व ट्रकसह चालक फरार
By admin | Updated: July 7, 2014 00:03 IST