चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात ड्राेनद्वारे मालमत्तांच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्णत्वाच्या दिशेने आहे. आठ तालुक्यातील ८४३ गावांमध्ये ड्राेनद्वारा मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून सनद वाटप केल्या जात आहे. सर्वेक्षणानंतर तपासणी झाल्यावर मालमत्ता कार्डही वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाच्या वतीने गावठाणातील मालमत्तांचे ड्राेनद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात वर्धा, आर्वी, आष्टी, कारंजा, समुद्रपूर, हिंगणघाट, सेलू आणि देवळी या आठ तालुक्यातील ८४३ गावांचा समावेश असून या गावातील गावठाणातील मालमत्तांचे ड्राेनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे या गावांतील सर्वेक्षणाला अडचणी निर्माण झाल्या हाेत्या. मात्र, आता कामाला गती आली असून सुमारे सर्वच मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.नागरिकांना त्यांच्या मालमत्तांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी, जमीन क्षेत्रावरून वाद उद्भवू नये, यासाठी केंद्र व राज्य शासनाने या मोहिमेवर लक्ष केंद्रित केले होते. येत्या काही दिवसांत आठही तालुक्यातील ८४३ गावातील नागरिकांना मालमत्तांचे कार्ड वाटप सुरु होणार आहे. ज्या मालमत्तांचे कार्ड वाटप झाले त्यांचे फेर देखील होत आहे. काहींना सनद दिल्या आहेत. तर, काहींच्या देणे शिल्लक असल्याची माहिती भूमिअभिलेख कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
तीन तालुक्यातील सहा गावात सनद वाटप - जिल्ह्यातील विविध गावांतील गावठाणातील मालमत्तांचे सुमारे ३ ड्राेनच्या सहाय्याने सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यापैकी वर्धा तालुक्यातील २ गावात २०२ मालमत्तांची सनद देण्यात आली आहे. - तसेच समुद्रपूर येथील २ गावात ७५ आणि आष्टी तालुक्यातील २ गावात ५५ मालमत्तांच्या सनदचे वाटप करण्यात आले आहे.
तपासणीनंतर देणार ‘प्राॅपर्टी कार्ड’सध्या ड्राेनच्या मदतीने आठही तालुक्यातील सुमारे ८४३ गावांतील मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता मालमत्तांची तपासणी केली जात आहे. तपासणी झाल्यावर मालमत्ताधारकांना ‘प्राॅपर्टी कार्ड’ देण्यात येणार असल्याची माहिती आहे.