संदीप श्रीवास्तव : आयएमएचा पदग्रहण समारंभवर्धा : डॉक्टरांवर होणारे हल्ले निषेधार्ह असले तरी ते समाजाचे वैद्यकीय सेवेबरोबर असलेले समीकरण बिघडते आहे, हे स्पष्ट करणारी आहे. समाजाचे वैद्यकीय सेवेबरोबर बिघडते समीकरण या विषयावर बोलतानाच डॉक्टरांनी अंतर्मुख होऊन आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे, असे मत जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय सावंगी (मेघे) अधिष्ठाता डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.इंडियन मेडिकल असोसिएशन वर्धाच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ शुक्रवारी आर.एम. रायजादा मेमोरियल आयएमएल हॉल इंझापूर येथे पार पडला. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अनुपम हिवलेकर यांनी अध्यक्षपदाचा भार डॉ. सुनील महाजन यांच्याकडून स्वीकारला. डॉ. शंतनु चव्हाण यांनी सचिव पदाचा भार डॉ. नहुष घाटे यांच्याकडून स्वीकारला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष डॉ. टी.सी. राठोड, डॉ. पातोंड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, उपस्थित होते. डॉ. राठोड यांनी आयएमएचे सभासद डॉक्टर्स व समाज संबंध दृढ करण्याबाबत मार्गदर्शन केले. १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आयएमएच्या सत्याग्रहाबाबत भूमिका मांडली. डॉ. पातोंड यांनी आयएमएने सर्वसामान्य जनतेपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवावी. ती सामान्य माणसांच्या खिशाला परवडणारी असावी, असे सांगितले. डॉ. मडावी यांनी इतर डॉक्टरांनी आयएमएचे सदस्य होण्याचा व आयएमएच्या योजनांचा लाभ घेण्याचा सल्ला दिला. संघटनेस बळकटी द्यावी तसेच खासगी वैद्यकीय सेवा व शासकीय वैद्यकीय यंत्रणा यात समन्वय साधून समाजाला निरोगी ठेवण्यात योगदान देण्याचे आवाहन केले.नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देत जुन्या कार्यकारिणीने केलेल्या कामांचे कौतुक मान्यवरांनी केले. माजी सचिव डॉ. घाटे यांनी मागील वर्षातील आयएमएच्या घडामोंडीचा आढावा घेतला. आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आयएमए शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अनुपम हिवलेकर, यांनी आयएमएच्या विविध कार्यक्रमांमध्ये सदस्यांचा सहभाग वाढविण्याची तसेच वैद्यकीय सेवेला समाजातील गरजू व शेतकऱ्यांच्या निराधार कुटुंबापर्यंत पोहोचविण्याची हमी दिली. नवनिर्वाचित सचिव डॉ. शंतनु चव्हाण यांनी आयएमए सदस्यांचे वैद्यकीय ज्ञान काळानुरूप अद्ययावत करण्याचा मानस व्यक्त केला. आयएमए शाखेला अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करण्याचे जाहीर केले.कार्यक्रमाचे संचालन डॉ. स्वप्निल तळवेकर व डॉ. शिरीष वैद्य यांनी केले तर आभार डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी मानले. कार्यक्रमाला आयएमएचे सदस्य डॉक्टर्स उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
डॉक्टरांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे
By admin | Updated: November 8, 2015 02:05 IST