लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा (घा.) : महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर पोहोचून महाराष्ट्रातील २० जिल्ह्यातील ७० दिव्यांग बांधवांनी नववर्षाचे स्वागत केले. शिखर सर करणाऱ्यांमध्ये कारंजा (घा.) येथील दोघांचा समावेश आहे.अनेकांनी फक्त शिकताना अभ्यासक्रमात वाचलेले कळसूबाई शिखर प्रत्यक्षात चढण्याची यशस्वी मोहीम कारंजा येथील हरिभाऊ हिंगवे व उमेश खापरे यांनी केली आहे. दिव्यांगांच्या इच्छाशक्तीला शिवुर्जा प्रतिष्ठानची जोड मिळाली. त्यामुळे ही मोहीम यशस्वी झाल्याचे मत या मोहिमेत सहभागी झालेल्या दिव्यांग बांधवांनी व्यक्त केले. गेल्या आठ वर्षांपासून यशस्वीपणे महाराष्ट्रातील दिव्यांगांना दरवर्षी शिवुर्जा प्रतिष्ठानच्या वतीने ही संधी उपलब्ध करून देण्यात येते. या मोहिमेत सहभागी झालेले सर्व दिव्यांग कळसूबाईच्या पायथ्याशी जहाँगीरदारवाडी या गावात एकत्र आले होते. ३१ डिसेंबरला दुपारी २ वाजता सर्वांनी कळसूबाई शिखर चढाईला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, कळसूबाई माता की जय अशा घोषणा देत दिव्यांगांनी शिखर चढाईसाठी कूच केले. या मोहिमेत सहभागी स्त्री व पुरुष दिव्यांग एकमेकांना आधार देत होते. रात्री ७ वाजता सर्वांनी कळसूबाई शिखराचा माथा गाठला. शिखरावर असलेल्या कडाक्याच्या थंडीत व सोसाट्याच्या वाऱ्यात सर्वांनी तंबूमध्ये मुक्काम ठोकला. नववर्षाच्या पहाटे म्हणजे १ जानेवारीला माथ्यावर असणाऱ्या कळसूबाई मंदिरात त्यांनी कळसूबाईचे दर्शन घेतले. तसेच उगवत्या सर्याला नमस्कार करीत सर्व प्राणिमात्राला सुखी ठेव असे साकडे घातले. त्यानंतर सकाळी १० वाजता परतीची वाट धरत खाली उतरण्यासाठी सुरुवात केली. दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांनी जहाँगीरदारवाडी गाव गाठले. विविध प्रकारचे दिव्यांग यात सहभागी झाले होते. सर्व सहभागी दिव्यांगांना शिवुर्जा प्रतिष्ठानच्या वतीने कळसूबाई शिखर यशस्वीपणे सर केल्याबद्दल प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. उपक्रमात सहभागींवर कोैतुकाचा वर्षाव होतो आहे.
कारंजाच्या दिव्यांग बांधवांनी सर केले कळसूबाई शिखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 05:00 IST
अनेकांनी फक्त शिकताना अभ्यासक्रमात वाचलेले कळसूबाई शिखर प्रत्यक्षात चढण्याची यशस्वी मोहीम कारंजा येथील हरिभाऊ हिंगवे व उमेश खापरे यांनी केली आहे. दिव्यांगांच्या इच्छाशक्तीला शिवुर्जा प्रतिष्ठानची जोड मिळाली. त्यामुळे ही मोहीम यशस्वी झाल्याचे मत या मोहिमेत सहभागी झालेल्या दिव्यांग बांधवांनी व्यक्त केले.
कारंजाच्या दिव्यांग बांधवांनी सर केले कळसूबाई शिखर
ठळक मुद्दे२० जिल्ह्यातील ७० दिव्यांग झाले होते सहभागी : नववर्षाच्या प्रारंभी राबविला उपक्रम