लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात बऱ्यापैकी ओसरली असली तरी आतापर्यंत कोरोना या विषाणूने जिल्ह्यातील तब्बल १ हजार ३२५ व्यक्तींचा बळी घेतल्याचे वास्तव आहे. यात ८२० पुरुष तर ५०५ महिलांचा समावेश आहे. कोविड मृतात वयाची साठी पार केलेले सर्वाधिक असून कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.जिल्ह्यात १० मे २०२० रोजी कोविडचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात जिल्ह्यात कोविडच्या पहिला आणि दुसऱ्या लाटेने उच्चांकी गाठत जिल्ह्यात मृत्यू तांडव करण्याचा प्रयत्न केला. सध्या जिल्ह्यात केवळ तीन ॲक्टिव्ह कोविड बाधित असून नवीन रुग्ण सापडण्याची गती बऱ्यापैकी मंदावली आहे. काेविड पॉझिटिव्हिटी दर बऱ्यापैकी खाली आल्याने जिल्हा प्रशासनाने लादलेले अनेक कठोर निर्बंधही मागे घेतले आहेत. सध्या वर्धा जिल्ह्याचा आर्थिक गाढा हळूहळू रुळावर येत असला तरी कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार ३२५ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यात ६१ ते ७० वयोगटातील २२८ पुरुष व १३७ महिला असे एकूण ३६५ व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने दक्ष राहण्याची गरज आहे. प्रतिबंधात्मक लस घेणे, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे सध्या फायद्याचे आहे.
जिल्ह्यात ॲक्टिव्ह कोविड बाधित नाममात्र असले तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन यासह कोविडची प्रतिबंधात्मक लस घेणे हा सध्या खबरदारीचा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनीही नजीकच्या केंद्रावर जावून काेविडची लस घेत स्वत: व स्वत:च्या कुटुंबाला सुरक्षित करून घ्यावे. - डॉ. प्रवीण वेदपाठक, प्रभारी जिल्हा आरोग्य
अधिकारी, वर्धा.