रामदास तडस यांचे निवदेन : अमरावती-अजनी इंटरसिटीची वेळ बदलण्याची मागणी वर्धा : अनेक दिवसांपासून प्रवासी संघटना व दैनंदिनी प्रवास करणारे पासधारक, मासिक पासधारक प्रवाशांना अमरावती-नागपूर व नागपूर बल्लारशाह दरम्यान अनेक समस्याचा सामना करावा लागतो. याला अनुसरून खा. रामदास तडस यांनी शुक्रवारी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. वर्धा रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी उत्स्फूर्तपणे रेल्वे रोको करून पासधारकांनी ऐक्याचे दर्शन घडविले. यानंतर रेल्वे स्थानकावरच सभा झाली. या सभेकरिता वर्धेतील आमदार खासदारासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी दिलेले प्रमुख मागण्याचे निवेदन आज त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे सादर करून चर्चा केली. रेल्वेमंत्री यांनी संपूर्ण निवेदन समजून घेत त्वरित कार्यवाहीकरिता संबंधित विभागाला पाठविले. तसेच या निवेदनातील प्रमुख मागण्यापैकी एक असलेल्या अमरावती-अजनी (नागपूर) इंटरसिटी एक्स्प्रेस सकाळी ५.३० वाजता ऐवजी ७ करण्याकरिता सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच ही मागणी पूर्ण करण्याविषयी सकारात्मक आवश्वासन त्यांनी दिल्याचे खा. तडस यांनी कळविले आहे. रेल्वे पासधारकांच्या समस्या मार्गी लागण्याकरिता व त्यांना दिलासा देण्याकरिता रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्या सुचनेनुसार महाप्रबंधक मध्य रेल्वे मुंबई, विभागीय रेल्वे प्रबंधक, नागपूर यांच्याकडे विशेष बैठक होणार असल्याचे खासदारांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.(प्रतिनिधी) हिंगणघाट येथील रेल्वे उड्डाणपुलाचा मुद्दा संसदेत नागपूर- हैदराबाद मार्गावर असलेल्या हिंगणघाट येथील रेल्वे गेटवर गत अनेक वर्षांपासून पुलाचे बांधकाम सुरू आहे. तो पूर्णत्त्वास येत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याची जाणीव लक्षात घेऊन खा. रामदास तडस यांनी लोकसभेत अतारांकित प्रश्न उपस्थित केला. अनेक वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर अस्तित्वात असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे कार्य सुरू आहे. दरम्यानच्या काळात खा. तडस यांनी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण व भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत या कार्याला गती देण्याच्या सूचना केल्या होत्या. रेल्वे विभागातर्फे मेगा ब्लॉक उपलब्ध करून दिला जात नसल्याने हे उड्डाणपुलाचे कार्य संथगतीने सुरू असल्याचे कारण अधिकाऱ्यांनी दिले होते. या समस्येला अनुसरून व संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या आधारे खासदारांनी रेल्वे मंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेअंती पूल लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
रेल्वे पासधारकांच्या समस्यांवर रेल्वेमंत्र्यांशी चर्चा
By admin | Updated: March 18, 2017 01:09 IST