मुख्यमंत्र्यांना निवेदनातून वर्धेतील तरुण-तरुणींचे साकडे वर्धा : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतकरी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहे. वर्धेसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्या. शेतकरी आत्महत्येचे सत्र अद्यापही सुरू असून आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शासनाने उचलावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून वर्धेतील तरुण-तरूणींनी केली आहे. निवेदनातून, घरातील कर्त्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास त्याचा संपूर्ण परिवार उघड्यावर येतो. कर्ज बाजारीपणा, सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा, शेतमालाला न मिळणारा योग्य भाव आदी करणांमुळे शेतकरी हतबल होत आत्महत्येचा निर्णय घेत आहे. त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याच्या पाल्याच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरविले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्याला आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्यावरील कर्ज तात्काळ माफ करण्यात यावे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा, अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना निरज बुटे, अजिंक्य मकेश्वर, शंतनु भोयर, अमर बेलगे, धीरज चव्हाण, दुष्यंत ठाकरे, अमेय देवगडकर, अमोल थोटे, निखील ठाकरे, लोकेश साहु, सुमेध हजबे, आशीष वासनिक, शुभम बानोडे, वैष्णवी डाफ, कृतिका भोयर, पलक रोहनकर, श्रद्धा बारोकर आदींची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना फीमध्ये सवलत द्या
By admin | Updated: April 1, 2017 01:08 IST