सेवाग्राम : भावी अध्यापिकांनी गांधीजींच्या पावन भूमीत राहून नई तालिम शिक्षण प्रणाली प्रत्यक्ष अनुभवावी़ त्याची अनुभूती घ्यावी, या अभ्यास हेतूने २४ शिक्षिकांनी धडपड चालविली आहे़ याच शिक्षण लालसेतून उत्तरप्रदेशातील २४ शिक्षिका महात्मा गांधी आश्रमात दाखल झाल्यात़ त्या आश्रम व नई तालिमच्या शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत़उत्तरप्रदेशातील फैजाबाद येथील नर्सरी टिचर्स ट्रेनिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी १० नोव्हेंबर रोजी नई तालिममध्ये दाखल झाल्या आहेत़ त्यांच्या सोबत प्राचार्य अंजली झापटे व शिक्षिका पूनम लखवानीही आल्या आहेत़ चार दिवस बापूंच्या आश्रमात राहून आश्रमच्या दैनंदिन कार्यक्रमात त्या सहभागी होत आहेत़ यात प्रार्थना, श्रमदान, अध्ययन, चिंतन, प्रश्नोत्तरे आणि व्याख्यानात त्या सहभागी होत आहेत़ यातून गांधीजींचे कार्य, जीवनचरित्र, मूल्य आणि त्यांनी साकारलेल्या नई तालिम शिक्षण प्रणालीचा अभ्यास सर्व विद्यार्थिनी करीत आहेत़ चिमुकल्यांना शिकवायचे असल्याने खरे शिक्षण काय, याचा अभ्यास करण्यासाठी ही भेट सार्थकी लागणार आहे़ बापूंचे नियम, मूल्य याची प्रकर्षाने गरज जाणवत असून येथील वातावरणाने प्रभावित झाल्याच्या भावना पूनम लखवानी यांनी प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या़विद्यार्थिनींना आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री प्रा़डॉ़ श्रीराम जाधव, अशोक गिरी, सुषमा शर्मा आदींचे मार्गदर्शन लाभले़(वार्ताहर)
आश्रम व नई तलिमच्या शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव
By admin | Updated: November 16, 2014 23:10 IST