जागोजागी चिखल : नागरिकांचे आरोग्य धोक्यात देवळी : स्थानिक साईनगर तिवारी ले-आऊट तसेच केदार ले-आऊटमधील काही भागात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे चिखल तयार झाला आहे. त्यामुळे ये-जा करताना अडचण निर्माण होत आहे. सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी सांगुनही सुधारणा होत नसल्यामुळे नागरिकात रोष आहे. या दोन्ही ले-आऊट्समध्ये गत १० ते १५ वर्षापासून नागरी वस्ती आहे. अजूनपर्यंत या परिसरात नागरी सुविधा न पोहचल्यामुळे नागरिकांना, शाळकरी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रस्त्याअभावी जागो-जागी चिखल साचतो. पालकांना खांद्यावर उचलून आपल्या पाल्याला पक्क्या रस्त्यापर्यंत घेऊन जाण्याची वेळ आली आहे. पक्के रस्ते व नाल्याची व्यवस्था होतपर्यंत रस्त्यांवर किमान मुरुम टाकून ये जा करण्याकरिता व्यवस्था करावी अशी मागणी नागरिक करीत आहे. अनेक भागातील पथदिवे बंदावस्थेत आहेत. दुरुस्तीकडेही पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. न.प.च्या नळ योजनेची व्यवस्था होयपर्यंत विंधन- विहीरीचे काम हाती घेवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी परिसरातील नागरिकांनी पालिका मुख्याधिकारी विजय देशमुख यांना निवेदन दिले. आवश्यक कामांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच रस्त्यांवर मुरुम टाकून जाण्या-येण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात येईल. अशी हमी न.प. मुख्याधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना दिली.(प्रतिनिधी) कराचा भरणा करूनही सुविधांचा अभावच साईनगर तिवारी व केदार ले-आऊटमध्ये नागरिक १५ वर्षांपासून राहत आहेत. पालिका प्रशासन त्यांच्याकडून नागरी सुविधा पुरविण्यासाठी कर वसुली करते. पण त्याबदल्यात देण्यात येत असलेल्या असलेल्या सुविधा अत्यंत तोकड्या असल्याचे रहिवासी सांगत आहेत. सध्या पावसाचे दिवस आहेत. पक्के रस्ते नसल्याने संपूर्ण ले-आऊटमध्ये सर्वत्र चिखल तयार झाला आहे. त्यातच परिसरातील पथदिवे बंद असल्याने रात्रीला घरापर्यंत कसे जावे असा प्रश्न नागरिकांना पडतो. शाळेत जाताना तर पालकांना आपल्या पाल्यांना खांद्यावर उचलून न्यावे लागते. त्यामुळे येथील नागरिकांना पालिका मुख्याधिकारी यांना असुविधेबाबत निवेदन दिले.
नागरी सुविधांच्या अभावाने देवळीकर त्रस्त
By admin | Updated: August 10, 2016 00:41 IST