देवळी : आगामी अर्थसंकल्पीय वर्षासाठी देवळी पालिकेच्यावतीने १६ कोटी ५३ लाख रुपयांच्या खार्चाची तरतूद केली आहे. यात गत वर्षीची शिल्लक १३.२३ लाख रुपये दाखविण्यात आली. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष शोभा तडस यांनी अर्थसंकल्प सभागृहात मांडला असून तो सर्वानुमते संमत करण्यात आला.अर्थसंकल्पात न.प. अंतर्गत शिक्षण, सामान्य प्रशासन, सार्वजनिक सुरक्षितता, आरोग्य व सोयी, साफ सफाई, बांधकाम आदी विभागातील कामाचे नियोजन करून रकमेची तरतुद करण्यात आली. याबाबत पालिकेच्या सभागृहात पत्रपरिषदेचे आयोजन करून माहिती देण्यात आली. यावेळी खा. रामदास तडस व नगराध्यक्ष शोभा तडस यांची उपस्थिती होती.पालिकेकडे कर स्वरूपात जमा होणाऱ्या १.३ कोटीच्या उत्पन्नात शहराचा विकास शक्य नाही. त्यामुळे खासदार व आमदार निधी तसेच जिल्हा नियोजन समिती मार्फत निधी उभा करून विकासाला प्राधान्य देणार असल्याचे नगराध्यक्ष शोभा तडस यांनी सांगितले. नियोजित कामांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इंदिरा गांधी पुतळ्याचे पुनश्च सौंदर्यीकरण, पालिकेच्या माध्यमिक शाळा परिसरात दोन मजली ईमारतीचे बांधकाम, डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला व्यापारी संकूल, सुसज्ज लायब्ररीचे बांधकाम, घंटा गाड्यांची खरेदी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील व्यक्तींसाठी शौचालयाचे बांधकाम, तातडीची पाणीपुरवठा योजना, अल्पसंख्यांक अनुदान विकास कामे, रमाई घरकुल योजना तसेच झोपडपट्टी विकासांतर्गंत केंद्रशासन पुरस्कृत घरकुल योजना, नवीन नियमानुसार जास्तीच्या निधीची तरतुद केली जाणार आहे. न.प.च्यावतीने अग्नीशामक दलाच्या गाडीचे पैसे भरण्यात आले आहे. येत्या ६ दिवसात ही गाडी पालिकेत येणार असल्याचे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
देवळी पालिकेचा १६. ५३ कोटींचा अर्थसंकल्प
By admin | Updated: February 13, 2015 00:23 IST