सेलू : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे नागपूर-वर्धा मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सेलू येथील उडाण पुलाजवळ अनेकदा गतिरोधकाची मागणी करूनही महत्त्वाच्या ठिकाणी गती कमी करण्यासाठी गतिरोधक नाही. महामार्गावर वाहनांची गती अधिक राहत असल्याने अपघाताच्या घटना वाढ होत आहे. शिवाय सांकेतिक चिन्ह दर्शविणारे फलक नसल्याने वाहन चालकांची दिशाभुल होते. यामार्गाने वर्धा, यवतमाळ, नागपूरकडे जाणारी वाहतूक असते. राज्यमार्ग असल्याने वाहनांची गती अधिक असते. उडान पुल परिसरात गतिरोधक नसल्याने रस्ता ओलांडणार्या पादचार्यांना अपघात होतो. वाहनांना गती कमी करण्यासाठी दर्शविणारे पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाही. या भागात गरज असताना या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या जात आहे. नागपूरकडून वध्र्याकडे जाताना सेलू येथील उडाणपुलावर चढण्याआधी अनिल सॉ मिलजवळ धोकादायक चौरस्ता आहे. या ठिकाणावरून सेलू शहरात जाणारे वाहने बायपास जावी म्हणून महामार्ग व बायपास रस्त्याच्या मधात रस्ता दुभाजक लावण्यात आले आहे. अनेक वर्षापासून दुभाजकाची नव्वद टक्के शती झाली आहेत. भरधाव वाहने मधातूनच मार्ग काढून महामार्गावर येतात. यामुळे अपघात वाढले आहे. कधीकधी महामार्गावरील वाहने भरधाव गावात जाण्यासाठी या फुटक्या रस्ता दुभाजकातून घुसतात. या गोंधळात अनेकदा अपघात होऊन जीव गेला आहे. कित्येकांना अपंगत्व आले. मात्र निगरगट्ट रस्ता विकास महामंडळाचे अधिकारी याकडे लक्षच देत नाही. उडाणपुलावर चढण्यासाठी वाहने आपली गती अधिक वाढवितात व मधात असलेल्या रस्त्याबाबत सूचना फलक नसल्याने नव्या वाहनचालकांना माहिती नसते यामुळे या स्थळावर अपघात होतात. तसेच सांकेतिक चिन्ह दर्शविणारे फलक नसल्याने अनेकदा वाहन चालकांची तारांबळ उडते. उपाययोजना केल्यास काही प्रमाणात अपघाताला आळा बसू शकतो.
गतिरोधकअभावी सेलूत अपघाताची श्रृंखला
By admin | Updated: May 22, 2014 01:23 IST