तालुका युवक काँगे्रसचे तहसीलदारांना निवेदनआष्टी (श.) : शासनाने तुरीच्या जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा खासगी व्यापारी कमी भावाने तूर खरेदी करीत आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे येथे नाफेडने तूर खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी तालुका युवक काँग्रेसने केली आहे. याबाबत तहसीलदार सीमा गजभिये यांना निवेदन देण्यात आले.निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन होत नाही. शेतातील हाती आलेले उत्पन्न आणि लागवडीसाठी केलेला खर्च याचे गणित जुळत नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आला आहे. कर्ज व नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. अशा स्थितीत शासनाने शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. यावर्षी तूर पिकाला चांगले भाव असताना व्यापारी धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आष्टी हे तालुक्याचे ठिकाण आहे. येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र नसल्याने कारंजा व आर्वी येथे तूर न्यावी लागते. यामुळे येथे खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे, अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष युवराज राऊत, शहर अध्यक्ष संजय शिरभाते, नगरसेवक डॉ. प्रदीप राणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी
By admin | Updated: March 31, 2017 01:58 IST