हिंगणघाट : शहरात अतिक्रमण हटाव धडक मोहीम गत तीन दिवसांपासून राबविली जात आहे़ यात नगारिकांच्या संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे़ काही अतिक्रमण धारक या नुकसानीचा धसका घेत स्वत:च अतिक्रमण काढत असल्याचे गुरूवारी दिसून आले़ अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरात अनेक ठिकाणी भग्नावशेष दिसून येत आहेत़ गुरूवार या तिसऱ्या दिवशीही शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेचा धडाका सुरू होता; पण जोर ओसरलेला दिसून येत होता़तुटलेल्या, वाकलेल्या टिना, विटा, सिमेंटचे ओटे, कुंपण भिंत यासह सिमेंट व मातीचा खच सर्वत्र पडलेला दिसत आहे. अतिक्रमणाचा विशेष प्रभाव नंदोरी चौक, नांदगाव चौक, बसस्थानक, जुने बसस्थानक, पिंपळगाव चौरस्त्यावरील दुकानांची ओळ या भागात अधिक होता. शहरातील रस्त्यांचे रूंदीकरण आणि सौंदर्यीकरणाचा एक भाग म्हणून ही कारवाई केली जात आहे़अतिक्रमणाच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी झालेल्या धडक कारवाईने रस्त्यावरील अतिक्रमण हटवून आता बराच भाग मोकळा झाला आहे़ शिवाय अनेक रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे निदर्शनास येत आहे़ विशेष धडक मोहिमेमुळे आणि कडक कारवाईमुळे अतिक्रमण धारकांनी धास्तीपोटी आपापले अतिक्रमण स्वत:च काढून घेतले़ यामुळे कारवाई करणाऱ्या प्रशासनाचा त्रास कमी झाला असून नागरिकांचे नुकसानही टळले आहे़ नांदगाव चौरस्त्यावरील ७-८ ठेले उलथवून अतिक्रमणाची कारवाई सुरू झाली होती. यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील सेन्टजॉन कॉन्व्हेंटजवळ, शिवाजी मार्केट, रेल्वे चौकीच्या दोन्ही बाजूला असलेली दुकाने, पिंपळगाव चौरस्त्यावरील १५-२० दुकानांची, ठेल्यांची रांग अतिक्रमणात हटविण्यात आली़ यात अनेक ठेले व दुकाने शटर लावलेले होते. नंदोरी चौकातील अनेक ठेले, दुकाने, डॉ. आंबेडकर शाळेजवळील ठेल्याची मोठी रांग मोहिमेत सापडल्याने ते हटविण्यात आले़ बसस्थानक परिसरातही अतिक्रमण धारकांना मोहिमेचा फटका बसला. नागपूर रोड पेट्रोलपंप ते जुनी श्रीराम टॉकीज चौकापर्यंत तसेच महामार्गावरील अतिक्रमण हटवून बराच भाग मोकळा करण्यात आला़ अतिक्रमणामुळे शहरातील बहुतांश रस्ते अरूंद आणि त्रासदायक झाले होते. शहरातील वाहतुकीला याचा फटका बसत असल्याने नागरिकांना त्रासही होत होता. आता हे रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला़ अतिक्रमण हटाव मोहीम आतापर्यंतची मोठी कारवाई मानली जात आहे़(शहर प्रतिनिधी)
नुकसानीच्या धसक्याने हटविले अतिक्रमण
By admin | Updated: March 27, 2015 01:24 IST