वर्धा : देवळी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी मेघना वासनकर यांची शनिवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. शासकीय कर्तव्यात विलंबाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मेघना वासनकर यांच्या कार्यकाळात पालिकेच्या २२ स्थायी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मार्च ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत जिपीएफची रक्कम कपात करण्यात आली. मात्र ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या जीपीएफ खात्यात जमाच करण्यात आली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांचे व्याजाने नुकसान झाले. याची तक्रार संबंधित कर्मचाऱ्यांनी केली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करून ही बाब उजेडात आणली. तक्रार होताच क्षणाचाही विलंब न करता या बाबीला मुख्याधिकाऱ्याला जबाबदार घरून शासनाने अवर सचिव मिलिंद कुळकर्णींच्या स्वाक्षरीनिशी बदलीचे आदेश काढले आहे.मेघना वासनकर यांची बदली अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार पालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी चांदूरबाजारचे मुख्याधिकारी विजय देशमुख यांची बदली झाली. बदली अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
देवळी मुख्याधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
By admin | Updated: December 20, 2014 22:44 IST