लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यावर्षी पावसाने लवकरच दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची पेरणीकरिता लगबग सुरू झाली. मृग नक्षत्राच्या जिल्ह्यात सर्वदूर सरी कोसळल्याने शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीवर भर दिला आहे. ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात असले तरीही शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील पावसाचा अंदाज घेऊन पेरणीला गती दिली आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यापासून कपाशीची २७.६४, सोयाबीनची २.४५ तर तुरीची ९.५८ टक्के लागवड पूर्ण झाली आहे.जिल्ह्यातील आठही तालुक्यात चार लाख २८ हजार २१५ हेक्टरवर खरिपाच्या लागवडीचे नियोजन आहे. यामध्ये प्रामुख्याने कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांचा समावेश आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनने चांगलाच दगा दिल्याने यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या पेऱ्यामध्ये कपात केली आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांनी एक लाख ३७ हजार २६६ हेक्टरवर सोयाबीनची, तर दोन लाख १८ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड केली होती. परंतु यावर्षी कपाशीचा पेरा वाढविला असून, दोन लाख २७ हजार २५० हेक्टरवर कपाशीची लागवड होणार आहे. एक लाख २३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीनच्या लागवडीचे नियोजन आहे. सध्या शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीवर जोर दिलेला दिसून येत आहे. आतापर्यंत ५६ हजार ५३८ हेक्टरवर कपाशी, सात हजार १४४ तूर, तर तीन हजार ८३५ हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली आहे. काही शेतातमध्ये कपाशीचे पीक जमिनीबाहेर आले असून, डोलताना दिसत आहे. काळ्या जमिनीवर हिरवळ दाटायला लागली आहे. मृगधारांनी शेतशिवार हिरवेगार होत आहे.
पावसाची सुरु होताच जिल्ह्यात लागवडीला वेग आला आहे. आतापर्यंत कपाशीची २७.६४ तर सोयाबीनची २.४५ टक्के पेरणी आटोपली आहे. अजुनही पेरणीची लगबग सुरु असून शेतकऱ्यांनी कमीत-कमी १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय बियाणांची लागवड करू नये. हवामान खात्यानेही आता पावसात खंड पडणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी, टोबणी करावी अन्यथा नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी