सेवाग्राम ठाण्यात गुन्हा : मारहाणीचे गूढ कायम वर्धा : मित्रासोबत बाहेर गेलेल्या युवकाला त्याच्याच मित्रांनी मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. यावरून मृतकाच्या आईने याबाबत सेवाग्राम पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास तक्रार नोंदविली. विक्रांत देवराव भकणे रा. गजानन नगर असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून गोपाल धांदे व त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ८ वाजता विक्रांत हा त्याच्या शेजारी राहणारा गोपाल धांदे याच्यासोबत दुचाकीने बाहेर गेला होता. यानंतर गोपालने रात्रीच्या सुमारास विक्रांतला त्याच्या घरी सोडले. विक्रांत घरी परतला तेव्हा त्याच्या डोळ्याला गंभीर जखम झालेली होती. तसेच अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या. त्याची आई पुष्पा यांनी त्याला याबाबत विचारणा केली असता गोपालने मला पवनार नदीवर नेवून पाण्यात बुडून मारले असे सांगितले. विक्रांत गंभीर जखमी असल्याने तो अधिक बोलू शकला नाही. दरम्यान विक्रांतला शुक्रवारी (दि. १३ ) सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यात त्याच्या छातीलाही मार असल्याने निष्पन्न झाले. येथे उपचारादरम्यान सोमवारी रात्री ९ वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुष्पा भकणे यांनी मंगळवारी सेवाग्राम पोलिसात या घटनेची नोंद केली. तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ व ३४ अन्वये संशयित आरोपी म्हणून गोपाल धांदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील मारहाणीचे कारण अद्याप कळू शकले नाही. वृत्त लिहेपर्यंत कुणालाही ताब्यात घेतले नव्हते.(स्थानिक प्रतिनिधी)
मारहाण प्रकरणातील ‘त्या’ युवकाचा मृत्यू
By admin | Updated: May 18, 2016 02:11 IST