वर्धा : रात्रीच्या सुमारास कुटुंबियांसोबत झोपी गेलेल्या बहिण अन् भावाला ‘क्रेट’ नावाच्या विषारी सापाने दंश केल्यामुळे दोघांनाही अर्धांगवायूचा त्रास झाला. सध्या बहिण-भावावर सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याची माहिती सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीप्रकाश कलंत्री यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ही घटना समुद्रपूर तालुक्यातील गिरड या गावात १९ रोजी घडली असून दोघांनाही २० रोजी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
समुद्रपूर तालुक्यातील गिरड गावात मंगळवारी रात्रीच्या सुमारास कुटुंब घरी झोपले असताना ‘क्रेट’ जातीचा विषारी सापाने १२ वर्षीय मुलाला आणि त्याच्याच १७ वर्षीय बहिणीला चावा घेतला. या सापाचा दंश इतका बारीक असतो की दंश झाल्यावर वेदना देखील होत नाही. सापाने दंश केला हे कुणाच्याच ध्यानी मनी नव्हते. २० रोजी सकाळी भावंड उठल्यावर त्यांच्या पापण्या जड आल्या होत्या. त्यांना गिळता येत नव्हते. श्वासोच्छवासास त्रास होत होता. शरिरातील काही भागात अर्धांगवायू मारल्याचे दिसून आले. घरच्यांनी तत्काळ दोघांनाही गिरड येथील प्राथमिक उपचार केंद्रात भरती केले. मात्र, नेमके काय झाले हे डॉक्टरांनाही समजले नसल्याने त्यांनी सेवाग्राम येथील रुग्णालयात रेफर करण्याचा सल्ला दिला.
मंगळवारी २० रोजी भाऊ अन् बहिणीला सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता ‘क्रेट’ जातीच्या सापाने दंश केल्याचे उजेडात आले. दोघांनाही तत्काळ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून दोघांचीही प्रकृती नाजूक असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक श्रीप्रकाश कलंत्री यांनी दिली.
हा साप रात्रीच करतो दंश
‘क्रेट’जातीचा साप हा अतिशय सर्वसामान्य आहे. मात्र, हा साप कधीच दिवसा कुणाला चाव घेत नाही. उंदिर खाण्याच्या बेतात तो घरात शिरला आणि जमिनीवर झोपलेल्या भावंडांचा हात किंवा पायाचा स्पर्श झाल्याने ‘क्रेट’ जातीच्या सापाने दंश केला. या जातीच्या सापाने दंश केल्यास वेदना होत नाहीत. त्यामुळे लवकर निदान देखील होत नसल्याची माहिती आहे.
५० टक्के लोकांना ‘क्रेट’चा दंशसेवाग्राम येथील रुग्णालयात वर्षभरात तब्बल २०० हून अधिक सर्प दंशाच्या नोंदी होतात. मात्र, यापैकी ५० टक्के ‘क्रेट’ या सापाने दंश केल्याची प्रकरणे आढळून येतात. १० ते १२ रुग्णांचा मृत्यू वेळीच निदान न झाल्याने होतो. त्यामुळे तत्काळ निदान लावून उपचार घेण्याची गरज असते.
हा साप ‘फसवा’च...
‘क्रेट’ जातीच्या सापाने दंश केल्यावर वेदना होत नाही. मात्र, काही तासानंतर पापण्या जड होणे, अर्धांगवायू मारणे, गिळण्यास त्रास होणे, सूज येणे आदी लक्षणे आढळून येतात. सर्वसामान्य सापापेक्षा हा साप फसवाच आहे. त्यामुळे तत्काळ निदान होवून योग्य उपचार हाेणे महत्वाचे असते.
गिरड येथील १२ वर्षीय भाऊ आणि १७ वर्षीय त्याच्या बहिणीला ‘क्रेट’सापाने दंश केल्याचे निदान झाले आहे. दोघांवरही सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. दोघांनाही श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. किती दिवस व्हेंटिलेटवर राहील हे सांगता येत नाही. मात्र, दोघांचीही प्रकृती नाजूक आहे.श्रीप्रकाश कलंत्री, वैद्यकीय अधीक्षक, सेवाग्राम रुग्णालय, वर्धा.
हा साप मोठ्याप्रमाणात आढळून येतो. हा जहाल साप असून अवघ्या दोन तासांत या दंशामुळे मृत्यू होतो. त्यामुळे औषधाची माहिती अजूनही ग्रामीण भागात नाही. त्यामुळे सर्पमित्रांच्या मदतीने गावागावात जनजागृती करण्याची माेहिम राबवावी. लक्षणे आढळून आल्यास तत्काळ उपचार घ्यावे. नागरिकांनी भिंतीपासून काही दूर अंतरावर झोपावे. सरकारने सर्प दंशाने मृत्यू झालेल्यांना किमान दहा लाख रुपयांची मदत द्यावी.
गजेंद्र सुरकार, सर्पमित्र.