आर्वी : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांद्वारे बऱ्यापैकी भाव देत कापसाची खरेदी केली जात होती़ यामुळे आवक वाढली होती; पण वाढती आवक पाहून खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचा भाव प्रती क्विंटल २०० रुपये कमी केले़ यामुळे गत दोन दिवसांपासून कापसाची आवक मंदावली आहे. दररोज ६ हजार क्विंटल कापसाची आवक होत होती, ती घटून ४ ते ५ हजारांवर आली आहे.स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांद्वारे तसेच सीसीआयद्वारे कापूस खरेदी केला जात आहे़ शासनाचा हमीभाव ४०५० रुपये असल्याने त्याच दराने सीसीआय कापूस खरेदी करीत होते़ व्यापाऱ्यांचा कापूस खरेदीचा भाव मात्र ३ हजार ९०० रुपये होता़ सीसीआयकडून नगदी चुकारा मिळत नसल्याने शेतकरी व्यापाऱ्याला कापूस विकत होते़ गत आठवड्यात व्यापाऱ्यांनी ४ हजार रुपयांवर भाव देणे सुरू केले़ यामुळे आर्वीत दररोज चांदूर बाजार, धामणगाव (रेल्वे), कुऱ्हा, देवळी, कारंजा, पुलगाव, हिंगणघाट, अंजनसिंगी आदी भागातील शेतकरी आपला कापूस घेऊन येऊ लागले़ आर्वी तालुक्यातील तसेच इतर जिल्ह्यातील कापसाची आवक वाढली होती़ दररोज सहा हजार क्विंटल कापसाची आवक होत असतानाच कापूस खरेदीत तेजी-मंदी सुरू झाली. दोन दिवसांत आर्वी बाजारात विक्रमी कापसाची आवक झाली़ यातच व्यापाऱ्यांनी २०० रुपये प्रती क्विंटल कापसाचे भाव कमी करून खरेदी सुरू केली़ यामुळे आर्वी बाजारात कापसाची आवक मंदावली़ २७ जानेवारीपर्यंत येथील बाजारात २ लाख १२ हजार ६१८ क्विंटल कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केला़ मागील वर्षी कापसाला ६ हजार रुपयांपर्यंत भाव होता. यंदा शेतकऱ्यांना ५ हजार प्रती क्विंटल भाव अपेक्षित होता; पण नवीन वर्ष उजाळून पंधरवडा लोटला असताना भाव चार हजारांच्यावर सरकला नाही़ यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. नगदी चुकारा मिळत असल्याने शेतकरी कापूस विकत होते; पण भाव घटल्याने दोन दिवसांपासून कापसाची आवक मंदावली आहे़ कापसाचे भाव येत्या काही दिवसांत आणखी खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत रोहणा, खरांगणा येथे उपबाजार आहे़ रोहणा येथे एक, खरांगणा दोन व आर्वीत आठ जिनिंग प्रेसिंग आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीस येतो़ कापसाचे भाव पुन्हा वाढले तर आवक वाढण्याची शक्यता आहे़(तालुका प्रतिनिधी)ओलिताच्या कपाशीही उलंगवाडीसेलू - लांब धाग्याचा कापूस उत्पादित करताना येणारा महागडा खर्च कापसाच्या भावात आलेल्या घसरणीमुळे व उलंगवाडी पाहता कापूस उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. ४ हजार १०० रुपयांवर कापूस खरेदीचा मुहूर्त झाला़ आता शेतकऱ्यांच्या घरी काही प्रमाणात कापूस येत असताना भावात २०० रुपयांची घसरण झाली आहे़ खासगी व्यापाऱ्यांची खरेदी ३८०० ते ३८८० रुपयांवर आली आहे. बाजारपेठेत कापूस विक्रीस नेणे, कापूस वेचाई व नगदी रकमेसाठी एक किलोचे पैसे कापून देणे, यामुळे कापूस ३७०० रुपये भावात जात आहे. यंदाचा खरीप हंगाम प्रारंभापासूनच धोक्याची घंटा देत होता. त्यात उत्पन्न घटले. ओलिताची कपाशी घेणारे शेतकऱ्यांना १० ऐवजी ५ क्विंटलवरच समाधान मानावे लागत आहे. यातच अपेक्षेपेक्षा कमी भाव अन् खर्च अधिक, यामुळे शेतकरी हतबल झाले आहे.
कापूस भावावर मंदीचे सावट; आवक घटली
By admin | Updated: January 17, 2015 02:20 IST