आकोली : संगणक परिचालकांच्या आंदोलनादरम्यान महाआॅनलाईन कंपनीचे जिल्हा समन्वयक आणि तालुका समन्वयक यांच्या दरम्यान झालेला तोंडी समझोता व दिलेले आश्वासन पाळले नसल्याचे कारण पुढे करून सेलू तालुक्यातील ग्रामपंचायतमधील संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. अशा स्वरूपाचे निवेदन त्यांनी गटविकास अधिकारी सेलू यांना शनिवारी दिले.संगणक परिचालकांनी केलेले काम बंद आंदोलन एका समझोत्यानुसार मागे घेतले होेते. विशेष मानधनावर नियुक्ती केली असताना महाआॅनलाईनने आता नवा प्रस्ताव पुढे केला असून एन्ट्री नुसार मानधन देण्याचा प्रस्ताव संगणक परिचालाकांपुढे ठेवला आहे. त्यामुळे तो प्रस्ताव संगणक परिचालकांनी धुडकावून लावला आहे. जुलै महिन्यापासून कपात केलेले मानधन अदा करा, ही त्यांची मागणी होती. समझोत्यानुसार १५ आॅक्टोबरपर्यंत आणि आॅगस्ट महिन्याचे मानधन २० आॅक्टोबर पर्यंत देण्यात येईल, असा समझोता झाला होता. मात्र महाआॅनलाईनच्या जिल्हा व तालुका समन्वयकांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे ३५ संगणक परिचालकांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरू करण्याचा निर्धार केला आहे. तसे निवेदन संबंधितांना सादर करण्यात आले आहे. आंदोलनाचा फटका सर्वसामान्य माणसांना बसणार असल्यामुळे संगणक परिचालकांचे आंदोलन संपले तरच सामान्यांची कामासाठी होणारी कोंडी फुटणार आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.(वार्ताहर)
संगणक परिचालकांचे आंदोलन सुरू
By admin | Updated: October 25, 2014 22:44 IST