समुद्रपूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे हिंगणघाट, उमरेड मार्गावर समुद्रपूर पंचायत समितीजवळ मागील चार दिवसात तीन अपघात घडले. दोन अपघातात वाहनचालक किरकोळ जखमी झाले तर सोमवारी रात्री १० वाजता झालेल्या अपघातात तरुणाच्या हाताचे हाड पूर्णपणे मोडले.हिंगणघाट-उमरेड रस्त्यावरील पंचायत समिती ते तहसील कार्यालय दरम्यानच्या अर्धा किलोमिटर रस्त्याचे रुंदीकरण व सौंदर्यीकरणाचे काम मंजूर झाले आहे. त्यासाठी या रस्त्याच्या दुतर्फा असलेले अनेक मोठ-मोठे वृक्ष तोडण्यात आले. या वृक्षाचे जमिनीत रूतून असलेले बुंधे काढण्याचे काम नुकतेच करण्यात आले. वृक्षाचे बुंधे जमिनीतून काढल्याने रस्त्यालगत दुतर्फा अनेक ठिकाणी मोठाले खड्डे पडले. आठ दिवसांपासून हे खड्डे बुजविण्यात आलेले नाही. रस्त्यावरील मातीचे ढिगारे सुद्धा बाजूला केलेले नाही. या ढिगाऱ्यामुळे मागील चार दिवसात अपघाताच्या तीन घटना घडल्या सुदैवाने दोन अपघातात गंभीर हानी झाली नाही. परंतु सोमवारी रात्री १० वाजता नितीन उबाळे(३२) रा. समुद्रपूर हा मोटरसायकल क्र.एमएच- ३२-एन-८०८८ धुम्मनखेडा येथून समुद्रपूर येथे येत असताना या मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या खांद्याचे व हाताचे हाड मोडल्याने ग्रामीण रुग्णालय समुद्रपूर येथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून हिंगणघाट येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. बांधकाम विभागाच्या हजगर्जीपणामुळेच अपघात घडल्याची बोलल्या जात आहे.(शहर प्रतिनिधी)
बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा चार दिवसांत तीन अपघात
By admin | Updated: July 8, 2014 23:36 IST