ंहिंगणघाट : येथील गांधी वॉर्डातील मातृसेवा संघाजवळच्या ट्रान्सफार्मर मध्ये बिघाड होऊन विजेचा दाब वाढला. याचा फटका या भागातील नागरिकांना बसला बसला. त्यांच्या घरातील विजेची उपकरणे जळून सुमारे २५ लाख रुपयांची हानी झाली. सदर अपघातातील नुकसानीची भरपाई वीज वितरण कंपनीने द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सोमवारी रात्री २.३0 वाजताच्या दरम्यान गांधी वॉर्डातील सदर ट्रान्सफार्मर वर बिघाड होवून नुटूलचा पाईप जळाला. त्यामुळे वीज वाहिनीतील दाब प्रचंड वाढला. त्यामुळे नागरिकांच्या घरची उपकरणे कुलर, फ्रीज, मोठे फ्रिजर, एअर कंडीशनर, ट्युबलाईट, लाईट आदी उपकरणे निकामी झाली. रात्री अडीच वाजताच्या सुमारास ऐन झोपेत असताना सर्वत्र अंधार व जळाल्याचा वास सुटल्याने गरमीने त्रस्त झालेले नागरिक रस्त्यावर आले. त्यांनी सदर घटना कनिष्ठ अभियंता मडामे यांना दिली. त्यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी आले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. या दुर्घटनेत गांधी वॉर्डातील नागरिकांच्या विद्युत उपकरणाची मोठय़ा प्रमाणात हानी झाली. यात सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांच्या या नुकसानीला वीज वितरण कंपनी जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. या दुर्घटनेत ज्या नागरिकांच्या उपकरणाची हानी झाली त्यांनी आपल्या नुकसानाची भरपाई मिळण्याकरिता विनंती अर्ज वीज वितरण कंपनीच्या शाखा कार्यालयात करण्याचे अभियंता मडामे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
दाब वाढल्याने विजेच्या उपकरणांचा झाला कोळसा
By admin | Updated: May 13, 2014 23:50 IST