घोराड : तालुक्यातील ६३ ग्रामपंचायती व ११० गावांचा कारभार पाहणाऱ्या पंचायत समिती परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे़ ही अस्वच्छता तालुक्यातील गावोगावी असणारी स्वच्छता तर दर्शवित नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे. या प्रकारामुळे देशभर राबविले जाणारे स्वच्छ भारत अभियान देखावाच ठरत असल्याचे दिसते़२ आॅक्टोबरपासून स्वच्छ भारत अभियान सुरू झाले. या दिवशी नावापुरती केलेली पंचायत समिती कार्यालयाची स्वच्छता येणाऱ्यांचे लक्ष वेधत आहे. कृषी विभागाचे कार्यालय असलेल्या खोलीची रंगरंगोटी करण्यात आल्याचे केवळ दिसून येते़ या कार्यालयापुढे असलेला बगिचा पूर्णत: संपला असून यात केरकचरा साचला आहे़ कार्यालयाच्या मागील बाजूला गवत वाढले असून कचऱ्याची साफसफाई झालीच नाही. सभापती निवासाला झुडपांनी वेढा दिला आहे, पशुसंवर्धन विभाग, सभापती व उपसभापती यांच्या कार्यालयाच्या मागील बाजूने वाढलेली झाडेझुडपे स्वच्छतेचा संदेश देत असल्याचे दिसते़ ४ ते ५ एकर परिसरातील जीर्ण इमारतींकडे दुर्लक्ष असून पाणी गळू नये म्हणून कार्यालयावर प्लास्टिक ताडपत्रीचा आधार घ्यावा लागल्याचे दिसून येते़सर्वत्र स्वच्छ भारत अभियान राबविले जात असून पंतप्रधानांनी सुरू केलेल्या अभियानास सर्वत्र प्रतिसाद मिळत आहे; पण भाजपच्या ताब्यात असलेल्या येथील पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात अस्वच्छता असावी, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गत कित्येक वर्षांपासून पंचायत समिती कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात आलेली नाही़ ज्या इमारतीमध्ये सभा घेतल्या जातात, त्या सभागृहाच्या आजूबाजूचा परिसर पाहता या पंचायत समितीला स्वच्छता अभियानाचा विसर पडल्याचेच चित्र आहे़ शासनाचे अंग असलेल्या प्रत्येक विभागात हे अभियान राबविले जावे, असा उद्देश असताना अधिकारी, कर्मचारीच याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते़ पं़स़ कार्यालय आवारात कचऱ्याचे साम्राज्य असल्याने कर्मचाऱ्यांचेच आरोग्य धोक्यात येणार असून नागरिकांनाही त्रास सहन करावा लागणार आहे़ याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)
स्वच्छ भारत अभियान ठरतेय ‘देखावा’
By admin | Updated: November 16, 2014 23:10 IST