आर्वी शहर कृती समितीचे तहसीलदारांना निवेदनातून साकडेआर्वी : वाढत्या अतिक्रमणामुळे शहरातील वाहतुकीचा फज्जा उडाला आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत शहरातील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करावे व वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी आर्वी शहर कृती समितीने केली आहे. याबाबत बुधवारी तहसीलदार मनोहर चव्हाण व पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांना निवेदनही सादर करण्यात आले.शहरातील शिवाजी चौक ते गांधी चौक या रहदारीच्या रस्त्यावर हातफेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी, रस्ता अरूंद झाल्याने अपघात वाढले आहेत. विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय बाजपेयी व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या विषयावर तहसील कार्यालयात चर्चा केली. अतिक्रमण हटविण्याबाबत संयुक्त निवेदनही देण्यात आले. शहरातील मुख्य रस्ता असलेला शिवाजी चौक ते गांधी चौकपर्यंतच्या वाहतुकीच्या रस्त्यावर फेरीवाले हातगाड्यांचे अतिक्रमण करीत आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शिवाय अनियंत्रित शालेय अल्पवयीन मुले, मुली रहदारीच्या रस्त्यावर वाहने भरधाव चालवितात. अल्पवयीन विद्यार्थ्यांना वाहन चालविण्याची परवानगी नसताना हा प्रकार घडत असल्याचे दिसते. गांधी चौक व शिवाजी चौकाच्या दोन्ही बाजूला फेरीवाल्यांमुळे वाहतूक ठप्प होते. सामान्यांना पायी चालणेही कठीण होते. शिवाय हातगाडीधारक रस्त्यावरच कचरा टाकत असल्याने मोकाट गुरांचाही वावर वाढला आहे. यावर कार्यवाही करण्याची मागणी कृती समितीच्यावतीने करण्यात आली.शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी लायसन्स नसताना भरधाव वाहने चालवून अपघाताला कारणीभूत ठरतात. यावर त्वरित आवर घालावा, अल्पवयीन वाहनधारकांवर कार्यवाही करावी, अशी मागणी केली. यावेळी ठाणेदार शैलेश साळवी, तहसीलदार मनोहर चव्हाण, समितीचे प्रा. प्रशांत सव्वालाखे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद हिवाळे, नंदकिशोर थोरात, दादाराव गुल्हाणे, नगरसेवक संजय थोरात, विनय डोळे, प्रकाश गुल्हाणे, अजय करकमवार आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
शहरातील वाहतुकीचा फज्जा अडथळे दूर करणे गरजेचे
By admin | Updated: April 28, 2016 02:03 IST