पुलगाव : शहरात काही दिवसांपासून चोरट्यांच्या टोळीने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे़ दररोज रात्री चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांत दहशत पसरली आहे; पण पोलीस प्रशासन अगदी हातावर हात देऊन गप्प बसली आहे़ याबाबत तक्रार दाखल करण्यास गेलेल्यांनाच नको ते प्रश्न विचारून नाहक त्रास दिला जात असल्याने पोलीस प्रशासनाविरूद्ध असंतोष पसरला आहे. एक आठवड्यापूर्वी आर्वी रोडवरील रेल्वे गेटजवळील हॉटेलमधून गॅस सिलिंडर, कढई, झारे, गंज व अन्य साहित्य चोरट्यांनी लंपास केले़ शेतातील विहिरीवरील मोटार पंप, स्पिंकलर पाईप, विद्युत तार, स्प्रे-पंप चोरून नेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत़ सितारा होंडा पॉर्इंट वल्लभनगर येथील सिमेंट काँक्रीटमध्ये मजबूत बसविलेली मशीन, मोटर व लोखंडी भंगार साहित्य असा एकूण ५ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. शेतात पिकाचा हंगाम नसल्याने उन्हाळवाही करून शेतकरी घरी परत येतात. नेमका याचाच फायदा चोरटे घेत आहेत़ चोरीच्या घटना सातत्याने वाढत असून पोलीस गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप होत आहे़ घटनांची माहिती देण्यासही टाळाटाळ केली जात आहे़ लेखी तक्रार घेऊन जाणार्यास तुमचा रिपोर्ट बरोबर लिहिला नाही. शेतातील साहित्य कुणाच्या भरवशावर ठेवले होते. चोरी कुणी केली. तुमचा संशय कुणावर आहे. चोरी गेलेल्या वस्तुची किंमत तेवढी होती की नाही, ती वस्तू जुनी व भंगार होती काय, कमी रक्कम लिहा, डबल रिपोर्ट लिहा, असे प्रश्न विचारून तक्रारकर्त्यास ताटकळत ठेवले जाते़ तक्रारीची सत्यप्रत देण्यास टाळाटाळ केली जाते़ या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत़ पोलीस प्रशासनाने अवैध दारू, रेती माफिया, गुंड, चोरटे, चोरीच्या वस्तू खरेदी करणारे भंगार व्यावसायिक यांच्या साखळीचा शोध लावून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)
चोरट्यांच्या धुमाकुळामुळे नागरिकांमध्ये दहशत
By admin | Updated: May 19, 2014 23:49 IST