घेतलेल्या रकमेची पावतीही नाही : परवानगी नसताना लावली झेरॉक्स मशीन कारंजा (घाडगे) : येथील तहसील कार्यालयात असलेल्या महा-ई केंद्रावर विविध प्रमाणपत्राकरिता निर्धारित दरापेक्षा जास्त रक्कम घेतल्या जात आहे. या रकमेची कुठली पावतीही दिल्या जात नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची येथे लुट सुरू आहे. या परिसरात बिना परवानगीने खासगी झेरॉक्स मशीन लावण्यात आली आहे. त्या यंत्राला मात्र तहसील कार्यालयातून वीज पुरवठा होत आहे. नागरिकांची होत असलेली आर्थिक लूट थांबविण्यात यावी व घेतलेल्या रकमेची पावती द्यावी. तसेच या परिसरात मुद्रांक उपलब्ध करून द्यावा. यासह अनेक मागन्यासंदर्भात तहसीलदार काशीद यांना माहिती देण्यात आली. तहसील कार्यालयातील ग्रामदूूत केंद्रातून अधिकृत रक्कम घेऊन पावती देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. इतरही समस्या हळूहळू निकाली काढण्याचे आश्वासन दिले. वर्ग दोनच्या जमिनीचे रूपांतर वर्ग एक मध्ये करणे, विद्यार्थ्यांना जात व इतर प्रमाणपत्रे देणे याकरिता, विशेष शिबिर लावण्याचे कबूल केले.उत्पन्न प्रमाणपत्राकरिता येथे आल्यावर ८० रुपये आकारले जात आहे. वास्तविक या प्रमाणपत्राकरिता अधिकृत शुल्क म्हणून ३२.४७ रुपये व इतर १३ प्रकारच्या प्रमाणपत्राकरिता प्रत्येकी २२.४७ रुपये आकारण्याचा नियम आहे. याबाबत अ.भा. ग्राहक पंचायत द्वारा तहसीलदारांकडे याची तक्रार करण्यात आली. तहसीलदारांनी केंद्र प्रमुखाला बोलावून चौकशी केली असता चिल्लर नसल्यामुळे अधिकचे पैसे घेण्यात आल्याचे सांगितले. यापुढे रितसर पावती देण्याचे कबूल केले, पण अद्यापही पावती देणे सुरू झाले नसल्याची माहिती आहे.(तालुका प्रतिनिधी)
ग्रामदूत केंद्र चालकाकडून नागरिकांची आर्थिक लूट
By admin | Updated: August 30, 2015 01:59 IST