वन्यप्राण्यांचा त्रास : पक्ष्यांचाही उपद्रवनाचणगाव : वन्य प्राण्यांचा हैदोस, अधिक खर्च आणि अत्यल्प भाव यामुळे ज्वारीचे पीक सध्या नामशेष होत आहे. अनेक संकटांचा सामना करावा लागणारे हे ज्वारीचे पीक खातखेडा शिवारातील शेतात मात्र दिमाखात डोलत आहे. यामुळे हे शेत ये-जा करणाऱ्यांचे आकर्षण ठरतेय.पुलगाव ते कळंब मार्गावरील खातखेडा शिवारातील नंदकिशोर काळे यांचे शेत सध्या लोकांसाठी कुतहलाचा विषय ठरत आहे, ते शेतातील ज्वारीच्या पिकामुळे. सद्यस्थितीत दूरदूरपर्यंत ज्वारीचे शेत दृष्टीस पडणे अवघड आहे. या पिकाला जगविताना अधिक त्रास सहन करावा लागतो. रानडुकर, पक्षी ज्वारीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. अशा प्रतिकूल परिस्थितीतही नंदकिशोर काळे यांनी २८ जून रोजी ज्वारीची लागवड केली. १५ आॅक्टोबरपर्यंत पीक परिपक्व होऊन कापणी केली जाईल. आज ज्वारीची भाकर ही जेवणातून हद्दपार झाली आहे. ‘रेस्टॉरेंट’च्या युगात शेतातील हुरडापार्टीही लुप्त पावताना दिसते. हैद्राबाद-भोपाळ मार्गावरील या शेताजवळ थांबून भरलेली ज्वारीची कणसे पाहून नागरिक समाधान व्यक्त करतात. पक्ष्यांच्या बंदोबस्तासाठी लाकडी मचाण बांधून पक्षी हाकण्यासाठी मजूर ठेवला आहे. यातून ते पीक जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत.(वार्ताहर)
ज्वारीचे शेत ठरतेय नागरिंकांचे आकर्षण
By admin | Updated: September 11, 2015 02:32 IST