लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविडचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात ८ मेपासून जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत. याच कठोर निर्बंधाच्या १७ दिवसांत १९ हजार ६३१ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला तर १२ हजार ६०३ व्यक्तींनी लसीचा दुसरा डोस घेतला असून त्यात सर्वाधिक लाभार्थी ४५ ते ६० वयोगटांतील आहेत, तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.जिल्ह्यात १६ जानेवारीपासून महालसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. अवघ्या काही महिन्यांतच जिल्ह्यात लसीकरण मोहिमेने २.१५ लाखांचा उंबरठा ओलांडला आहे. लस तुटवड्यामुळे सध्या १८ ते ४४ वयोगटांतील लाभार्थ्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देणे बंद असले तरी मुबलक लससाठा मिळताच याही वयोगटांतील लाभार्थ्यांना कोविडची व्हॅक्सिन दिली जाणार आहे. ८ ते २४ मे या कालावधीत १७२ हेल्थकेअर वर्कस, ८६२ फ्रन्टलाईन वर्कस, १८ ते ४४ वयोगटांतील ३ हजार ४७९, ४५ ते ६० वयोगटातील १० हजार ३४८ तर ६० पेक्षा जास्त वयोगटांतील ४ हजार ७७० लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे तसेच २०३ हेल्थकेअर वर्कस, ८०४ फ्रंटलाईन वर्कस, ४५ ते ६० वयोगटांतील ६ हजार ५९३ तर ६० पेक्षा जास्त वयोगटांतील ५ हजार ३ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. एकूणच कठोर निर्बंधाच्या १७ दिवसांत कोविडची लस घेण्यात ४५ ते ६० वयोगटांतील लाभार्थीच पुढे असल्याचे आकडवारीवरून स्पष्ट होते. मात्र, लसीअभावी अजूनही अनेकांना लसीकरणाची प्रतीक्षा असून लस उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यात कोविशिल्डचे १८ हजार डोसnकोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन ही लस सध्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दिली जात आहे. सध्या जिल्ह्यातील कोव्हॅक्सिन लस संपली असली तरी कोविशिल्डचे सुमारे १८ हजार डोस जिल्ह्यात असल्याने तसेच ४५ पेक्षा जास्त वयोगटांतील लाभार्थ्यांना कोरोनाचा प्रतिबंधात्मक लस दिली जात असल्याने नागरिकांनीही नजीकच्या केंद्रावर जावून लसीकरण करून घेतले पाहिजे.
लाभार्थ्यांना देण्यात येणारी लस पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी लसीबाबत कुठलीही भीती मनात बाळगू नये. कोविड मृत्यू रोखण्यासाठी लस उपयुक्त असल्याने नजीकच्या लसीकरण केंद्रांवर जावून नागरिकांनी लस घ्यावी.- डॉ. प्रभाकर नाईक,
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.