वर्धा : २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठी भाजप नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून भाजपातून तीन महिलांची नावे पुढे आली आहेत. यापैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालायची यावर श्रेष्ठींमध्ये विचारमंथन सुरु असल्याची माहिती आहे.जि. प. वर पहिल्यांदा झेंडा फडकणार, अशी आशा भाजप नेते बाळगून आहेत. या अनुषंगाने नव्या अध्यक्षपदासाठी भाजपातून तीन नावे पुढे येत आहेत. यामध्ये हिंगणी जि.प. गटाच्या सदस्य चित्रा राणा रणनवरे, पोहणा गटाच्या सदस्य माधुरी चंदनखेडे आणि नारा गटाच्या सदस्य चेतना मानमोडे यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे. यामध्येही कोणाची वर्णी लावायची यावर भाजपात विचार मंथन सुरु असल्याची माहिती आहे. तीन सदस्यांपैकी चित्रा रणनवरे यांचे नाव अग्रक्रमावर असून या पाठोपाठ माधुरी चंदनखेडे यांच्या नावाची चर्चा आहे. चित्रा रणनवरे यांच्याकडून मात्र सकारात्मक प्रतिसाद अद्याप भाजपश्रेष्ठींना मिळालेला नसल्यामुळेच चंदनखेडे यांचे नावे पुढे आल्याचेही बोलले जात आहे. ही आयती संधी असल्याचे हेरुन आर्वी विधानसभा मतदार संघातील जि.प. सदस्य महिलेला हा बहुमान मिळावा म्हणूनही भाजपातील एक गट पुढे सरसावला आहे. यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालावी, असा प्रश्न भाजपश्रेष्ठींना पडला आहेत. आघाडीतर्फेही जि.प.ची सत्ता टिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू आहे. मात्र काही सदस्य संपर्काक्षेत्राबाहेर असल्यामुळे बहुमताचा आकडा जुळविणे हे पहिले आव्हान त्यांच्यापुढे आहे. हा आकडा जुळल्यानंतरच कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालायची याचा विचार होणार असल्याचे आघाडीतील सूत्रांचे म्हणणे आहे. विद्यमान स्थितीत तरी आघाडीत जि.प. ची सत्ता कायम राखण्यावरुन चिंतेचे वातावरण पसरले असल्याचे बोलले जात आहे. एका काँग्रेस नेत्याशी चर्चा केली असता ते नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले, जि.प. ची सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान आघाडीपुढे आहे. पहिल्यांदाच वर्धा जिल्हा परिषदेवर सत्ता कायम राखण्यात यश मिळेल, याची शाश्वती अत्यल्प आहे. आघाडीने आशा सोडली नसलीतरी काही सदस्य फितुर झाल्यामुळे यात कितपत यश येते हे त्याचदिवशी कळेल.(जिल्हा प्रतिनिधी)
भाजपात तीन महिला सदस्यांच्या नावावर मंथन
By admin | Updated: September 18, 2014 23:38 IST