वर्धा : येत्या २ मे रोजी वर्धेत मुख्यमंत्र्यांचा दौरा प्रस्तावित असून तसे पत्रही जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेणार असल्याने प्रशासन चांगलेच धास्तावले आहे. बैठकीची तयारी म्हणून जिल्हा प्रशासन चांगला अहवाल तयार करण्याच्या कामात व्यस्त झाल्याचे समजते.बैठकीत शेतकरी आत्महत्या व उपाययोजना हा महत्त्वाचा विषय आहे. गत काही वर्षांच्या तुलनेत यंदाची शेतकऱ्यांची स्थिती सर्वाधिक बिकट आहे. सोबतच जलयुक्त शिवार अभियानाचाही आढावा मुख्यमंत्री घेणार आहे़ जलयुक्त शिवारसाठी यंत्रणा धावताना दिसत असली तरी अनेक शेतकऱ्यांना पांदण रस्त्याच्या समस्या उद्भवल्या आहे. यावर मात करण्यास मात्र कुठल्याही उपाययोजना होत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. केम प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधायची होती. या प्रकल्पाचे जिल्ह्यात किती काम झाले, आतापर्यंत किती शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली, याचाही आढावा घेणार आहेत. शेतात सिंचनाची सोय करून देण्याची मागणी शेतकरी नेहमीच करत आले आहे. शासनाच्या तशा योजनाही आहे; पण या योजनांतील विहिरींची दैना आहे. शेतापर्यंत विहिरीची योजना आली; पण त्यापासून किती शेतकरी शेतात सिंचन करीत आहे, याबाबतही मुख्यमंत्री जाणून घेणार आहेत. सेवाग्राम विकास आराखडा वर्धेत औत्सुक्याचा विषय आहे; पण तो पुढे सरकताना दिसत नाही. याकडे मुख्यमंत्री लक्ष देणार आहेत.जिल्ह्यात सर्व सुरळीत सुरू आहे, हे दाखविण्याचा खटाटोप सुरू असून जिल्हा प्रशासन कामाला लागल्याची माहिती आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीला गती देणार असल्याचेही सूत्राने सांगितले. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
मुख्यमंत्री घेणार वर्धा जिल्ह्याच्या विकासाचा आढावा
By admin | Updated: April 24, 2015 01:55 IST