वर्धा : भाजीपाल्याचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी त्यावर विविध रासायनिक औषधींची फवारणी केली जाते. त्यामुळे या भाजीपाल्यातील पौष्टीकता नष्ट होत आहे. या भाज्या मानवी शरीरासाठी घातक ठरत असल्यामुळे अशा भाज्या खाणेच आता धोकादायक झाले आहे. सध्या मार्केटमध्ये अनेक रासायनिक फावारणी औषधे विकायला आहेत. यातील अनेक कंपन्या आपली औषधे अतिशय चांगली आणि कुठल्याही प्रकारे हानीकारक नसल्याचा दावा करतात. त्याचप्रकारे अमक्या वाणावर हे औषध किती प्रभावी आहे. या रोगांवर हेच औषध फवारा अशा जाहिराती जागोजागी लटकलेल्या किंवा औषधांच्या दुकानात दिसतात. त्याची सत्यता कोणीच पडताळून पहात नाही. बाजारात सध्या बोगस औषधांचा साठा वाढत आहे. तसेच तपासणी करणारी सरकारी यंत्रणाही याकडे विशेष लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे दुकानदारही बोगस व जादा कमिशन असलेली औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारतात. शेतकऱ्याला यामध्ये नेमके मार्गदर्शन होत नाही. कृषी अधिकाऱ्यांनी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी ते करणे अपेक्षित आहे. पण तसे होत नाही. काही शेतकऱ्यांना मेळाव्यात परिसंवादात मार्गदर्शन करीत असताना त्यात विशिष्ट औषधांची व खतांची शिफारस करण्यासाठी ते कंपन्याची औषधे वापरण्यास सांगत असतात. पण एका चर्चासत्रात अमूक औषध वापरा, तर दुसऱ्या चर्चासत्रात तिसऱ्याच कोणत्या तरी औषधाबाबत सांगितले जाते. शेतकऱ्यांना या बाबी माहित नसतात. ते या मार्गदर्शकांवर विश्वास ठेवतात . त्याचप्रकारे औषध किती व कसे वापरावे याचे प्रात्यक्षिक दिले जातेच असे नाही. अशा वेळी कीड पाहून शेतकरी जास्त औषधाची फवारणी करतो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य अशा भाज्या खाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांनाही रासायनिक औषधांऐवजी परंपरागत गोमूत्र फवारण्यासारखे उपाय करुन नेहमी योग्य तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याची गरज आहे. शेतीशी काडीमात्र संबंध नसलेल्या मंडळीकडून मार्गदर्शन घेताना जागृत राहण्याची गरज आहे. तसेच नागरिकांनाही अशा भाज्या स्वच्छ करून खाण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)
रासायनिक फवारणीयुक्त भाज्या आरोग्यास धोकादायक
By admin | Updated: July 8, 2014 23:37 IST