वर्धा : एनएसयुआयच्या वर्धा जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष व महासचिव पदाच्या होणाऱ्या निवडणुसाठी तिघांनी आपले नामांकन दाखल केले आहे. यापैकी सर्वाधिक मते पटकावून कोण अध्यक्षपदाचा मान मिळवितो, याकडे जिल्हा एनएसयुआयचे लक्ष लागले आहे.नागपूर येथे काँग्रेस कमिटी कार्यालयात १२ मे रोजी एनएसयुआय प्रदेशाध्यक्षासह जिल्हा कार्यकारिणीची निवडणूक होऊ घातली आहे. जिल्हा कार्यकारिणीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व महासचिव पदासाठी निवडणूक होईल. वर्धा जिल्ह्यातून या पदांसाठी हितेश इंगोले, आशिष मोडक व सारंग खोंड यांनी आपले नामांकन दाखल केले आहे. या तिघांमध्ये सर्वाधिक मते मिळविणाऱ्या उमेदवाराच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार आहे. तर पाठोपाठ मते घेणाऱ्या उमेदवारांची उपाध्यक्ष व महासचिव म्हणून निवड समजली जाईल. यासाठी जिल्ह्यातील २२ काँग्रेस बुथ कमिटीवर निवडून आलेले २८ बुथ अध्यक्ष मतदान करतील. या निवडणुकीत आ. रणजित कांबळे समर्थकांचाच वरचष्मा असून तीनही उमेदवार त्यांचे समर्थक मानले जाते. यामुळे जिल्हा एनएसयुआयवर त्यांचेच वर्चस्व असले तरी तीन उमेदवारांमधून कोण नवा अध्यक्ष होईल, यासाठी रस्सीखेच सुरु असल्याची माहिती आहे. काँग्रेसमध्ये महेश तेलरांधे, विपीन राऊत, संदीप सुटे व सुधीर वसु ही मंडळी होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
एनएसयुआयच्या जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस
By admin | Updated: May 10, 2015 01:32 IST