भाजप मोठा पक्ष : २१ रोजी जि.प. अध्यक्ष निवडणूकवर्धा : जि.प.चे विद्यमान अध्यक्ष व उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ येत्या २१ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्याच दिवशी नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे लेखी आदेश राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे कक्ष अधिकारी अ. ल. गडकर यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहेत. यामध्ये वर्धा जिल्हा परिषदेचाही समावेश आहे.अडीच वर्षांपूर्वी जि.प.ची पंचवार्षिक निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेस व भारतीय जनता पक्षाला प्रत्येकी १७ असे समान यश मिळाले होते. राष्ट्रवादीच्या आठ जागांचे सहकार्य घेतले तरी बहुमतासाठी २६ हा जादुई आकडा जुळवणे काँग्रेस आघाडीपुढे पेच होता. अशाचत अपक्ष म्हणून निवडून आलेले गोपाल कालोकर यांनी आपल्या नेतृत्त्वावर निष्ठा दाखवून आघाडीलाच सहकार्य करण्याची भूमिका घेतल्यामुळे काँग्रेस व राकाँ आघाडीला सत्ता मिळविण्यात यश आले. ही आघाडी येत्या २१ सप्टेंबर रोजी आपला अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत चांगलेच पाणी मुरले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार हे भाजपात गेले. या बळावर जि.प. मध्ये भाजप सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीही तेवढ्याच ताकदीने सत्ता टिकविण्याच्या अनुषंगाने व्युहरचना करीत असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे जि.प. सदस्य विष्णू ताडाम यांचे निधन झाले. त्यांच्या मतदार संघात झालेली पोटनिवडणूक भाजपने जिंकली. यामुळे जि.प. मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. अपक्ष पाच, स्वभाप तीन आणि शिवसेना एक अशी विद्यमान स्थिती आहे. अटीतटीचे पक्षीय बलाबल असल्यामुळे मिनी मंत्रालयावर काँग्रेस झेंडा फडकत ठेवणार वा भाजप भगवा झेंडा फडकवते, याकडे आता ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष लागले आहेत. विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालिम असेल, या अनुषंगाने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असल्यामुळे भाजप, काँग्रेस आणि राकाँच्या दिग्गज नेत्यांची राजकीय शक्तीपणाला लागणार आहे. याकडे जनतेचेही लक्ष लागून आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
काँग्रेसपुढे सत्ता टिकविण्याचे आव्हान
By admin | Updated: September 7, 2014 00:02 IST