विरूळ (आ.) : स्थानिक मुरलीधर वार्डात दोन महिन्यांपूर्वी सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले; पण अल्पावधीतच हा रस्ता काही ठिकाणी उखडला आहे. या रस्त्यात संबंधित विभागाने गैरप्रकार केल्याची शंका नागरिक उपस्थित करीत आहे.मुरलीधर वॉर्डात नागरिकांच्या सोयीसाठी सिमेंट रस्त्याचे काम दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले; पण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्ता दोन महिन्यांतच काही ठिकाणी उखडला आहे. याबाबत नागरिकांनी संबंधित अभियंत्याला भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. यावर मी पाहून घेतो, असे उत्तर देण्यात आले; पण कुठलीही दुरूस्ती करण्यात आली नाही. या रस्त्याची त्वरित डागडुजी झाली नाही तर नव्यानेच बांधलेला रस्ता पूर्णपणे उखडण्यास वेळ लागणार नाही. दोन महिन्यांतच रस्त्याची दुरवस्था होत असल्याने एकूण बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय हा रस्ता ऊंच झाल्याने बाबाराव दाळींबकर यांच्या घरासमोर खड्डा पडला आहे. पाऊस आल्यास तेथे पाणी साचून त्यांच्या घराचे नुकसान होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा मुरूम भरणे व नाली काढणे गरजेचे होते; पण तसे केले नाही. यामुळे पाणी साचत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)
दोन महिन्यांतच उखडला सिमेंट रस्ता
By admin | Updated: July 24, 2015 01:56 IST