काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची ओरडवर्धा : जिल्ह्यातील नगर परिषदेचे ठिकाण असलेल्या सिंदी(रेल्वे) येथील वाचनालय आणि पोलीस क्वॉर्टरच्या मधातून वर्षभरापूर्वी बांधलेल्या सिमेंट रस्त्याची अल्पावधीतच दुरवस्था झाली आहे. परिणामी याप्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. शासन स्थानिक स्वराज्य संस्थानांतर्गत विकासासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी देते. या निधीचा विनियोग म्हणून शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाल्या, रस्ते यासोबतच साफसफाई व दिवाबत्ती आदींवर खर्च करावा लागतो. परंतु हा निधी कशा पद्धतीने खर्च हे सिंदी (रेल्वे) शहरातील रस्त्यांच्या कामावरून दिसून येते. केवळ वरवर सिमेंट पसरवून रस्ते तयार केले जातात. त्यानंतर काही दिवसांचा कालावधी लोटत नाही तोच त्या कामाची पारदर्शकता दिसून येते. असाच काहीसा प्रकार येथे निदर्शनास येत आहे. वर्षभरापूर्वी वाचनालय आणि पोलीस क्वॉर्टर परिसराच्या मधातून विजय विद्यालयाकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. आजघडीला या रस्त्याला जागोजागी तडे गेले असून गिट्टीसुद्धा उखडत आहे. तर काही ठिकाणी रस्ता उखडायला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे हा मुख्य रहदारीचा रस्ता नसून पर्यायी आणि अंतर्गत रस्ता आहे. तरीही या रस्त्याची एक वर्षातच दुरवस्था व्हावी, हा चिंतेचा विषय आहे. रस्ता उखडायला लागल्याची सर्वत्र चर्चा असताना संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून आहेत.लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी दखल घेऊन काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या कारभाराची चौकशीची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)
वर्षभरातच झाली सिमेंट रस्त्याची दैना
By admin | Updated: December 16, 2015 02:18 IST