समुद्रपूर : बस फेरी नियमितपणे सुरू करण्यासाठी समुद्रपूर तालुका प्रहार संघटनेच्यावतीने सोमवारी हिंगणघाट आगाराच्या द्वारावर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेऊन हिंगणघाट ते किन्ही (कवठा) बस सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहील असे लेखी आश्वासन आगार व्यवस्थापकांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. हिंगणघाट येथून समुद्रपूर तालुक्यातील किन्ही, कवठा ही बस फेरी सकाळी ९.३० व सायंकाळी ५.३० वाजता नियमित सुरू होती; परंतु सदर बस फेरी अचानक बंद करण्यात आली. त्यामुळे किन्ही, कवठा, रुणका, झुणका, निंबा, आरंभा या गावातील विद्यार्थी व नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. सदर बस सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू करण्यासाठी प्रहारचे तालुका अध्यक्ष देवा धोटे यांनी आगार व्यवस्थापकांशी चर्चा केली; मात्र यात कुठलाही मार्ग निघाला नाही. यामुळे ठिय्या आंदोलन करण्यात आले. आगराच्या द्वारावरच आंदोलन करण्यात आल्याने येथे येणाऱ्या व जाणाऱ्या बसगाड्यांची अडवणूक झाली. याचा त्रास प्रवाशांना होत असल्याने या आंदोलनाची दखल घेत अखेर हिंगणघाट आगार व्यवस्थापकांनी बस सेवा पूर्ववत सुरू राहील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी प्रहारचे समुद्रपूर तालुकाध्यक्ष देवा धोटे, प्रवीण जायजे, नितेश महाकाळकर, शरद काठूके, चेतन डाखोरे, अविनाश भोंगरे, घनश्याम नागपूरे, गजानन भेंडे, प्रशांत धोबे, चंदू राऊत, गोलू पानसे, दुर्वास अंड्रस्कर, गणेश भिसे, संदीप धोबे, कृष्णा लेंडे, सुरेश धोटे, इश्वर धोटे उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
ठिय्या आंदोलनानंतर बस सेवा पूर्ववत
By admin | Updated: July 12, 2016 02:37 IST