पुलगाव : येथील पालिकेच्यावतीने २९ कोटी २० लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. यात आठवडी बाजाराचा विस्तार व विकास, दलित वस्ती सुधार योजनेत मोठ्या नाल्याचे बांधकाम अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा योजनेचे बळकटीकरण नवीन हायमास्ट उभारणी इत्यादी विकासात्मक बाबी विचारात घेण्यात आल्या आहेत. पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष मनीष साहू, उपाध्यक्ष कांचन कोटांगळे, मुख्याधिकारी राजेश भगते, लेखापाल आनंद ढवळे यांच्या उपस्थितीत हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थ संकल्पात आठवडी बाजाराच्या विकासासाठी १.५० कोटी, दलित वस्ती सुधार अंतर्गत सांस्कृतिक भवन व मोठ्या नाल्या तसेच बांधकाम व रस्त्याकरिता २.५० कोटी तसेच सुजल निर्मल अभियानांतर्गत पाणी पुरवठा योजना बळकटीकरण व शहरात नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी ३.५० कोटी तर नवीन हायमास्ट उभारणी करीता ७० लाखांची तरतूद आहे. स्वच्छ व सुंदर शहराची कल्पना नजरेसमोर ठेवून शहराचा विकास व्हावा, शहरातील प्रकाश व्यवस्था अधिक चांगली व्हावी, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याकडे विशेष लक्ष देता यावे, शहरात पाणी पुरवठ्याचा सतत निर्माण होणारा प्रश्न कायमचा सोडविण्याला यात प्राधाण्य देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त नव्या अर्थसंकल्पात शहरातील नागरिकांना विशेष सुविधा देण्याचा पालिकेच्या प्रयत्न असल्याचे पालिकेच्यावतीने कळविले आहे.(तालुका प्रतिनिधी)
२९.२० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
By admin | Updated: February 22, 2015 01:45 IST